द्राक्ष बागेत घडांना पेपर लावताना घ्यावयाची काळजी

Grapes
Grapes

अलीकडे वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष बागेमध्ये सन बर्निंग, पिंकबेरी इ. समस्या वाढलेल्या आहेत. या समस्या टाळून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन मिळविण्याकरिता द्राक्ष घडांमध्ये पाणी उतरण्यास सुरुवात झाल्यानंतर पेपर लावणे अत्यंत गरजेचे आहे.

द्राक्ष पीक हे अन्य पिकांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असले तरी बदलत्या हवामानाला अत्यंत संवेदनशील पीक आहे. या नाजूक फळपिकाची जपणूक करण्यासाठी अधिक खर्चही येतो. दिवसेंदिवस द्राक्ष पीक अधिक आव्हानात्मक होत चालले आहे. मात्र, योग्य नियोजन, नवीन तंत्र यांचा योग्य वापर केल्यास द्राक्षाचे निर्यातक्षम उत्पादन शक्य आहे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन म्हणजे द्राक्ष घडात योग्य आकाराचे मणी, एकसारखा, आकर्षक रंग, गोड, कीड – रोग विरहित, कीडनाशक अवशेष मुक्त असलेला घड होय.

अलीकडे वातावरणातील बदलांमुळे सन बर्निंग, पिंकबेरी इ. समस्या वाढलेल्या आहेत. या समस्या टाळून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन मिळविण्याकरिता द्राक्ष घडांमध्ये पाणी उतरण्यास सुरवात झाल्यानंतर पेपर लावणे अत्यंत गरजेचे आहे .

घडांना पेपर लावण्याआधीची पूर्वतयारी
द्राक्ष घडांना पेपर लावण्याची योग्य अवस्था 

साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास सुरवात झाल्यानंतर पेपर लावावे. त्या आधी बागेतील कीड-रोगाचे नियंत्रण उत्तम झालेले असल्याची खात्री करावी. अन्यथा, घड लावूनही कीड-रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घड व मणी विरळणी 
निर्यातीसाठी आवश्यक असलेला मण्यांचा आकार, घडाची लांबी, सुटसुटीत व एकसारखेपणा, गोडी या बाबी मिळण्यासाठी वेलीवरील घडांची संख्या व प्रत्येक घडातील मण्यांची संख्या योग्य असणे अतिशय महत्त्वाचे आहे.

त्यासाठी पेपर लावण्याआधी वेलीचे वय, लागवडीचे अंतर, जात इ. गोष्टींचा विचार करून घडांची संख्या निर्धारित करावी. एकसारख्या वाढीचे, आकर्षक, कीड- रोग विरहित घड ठेवावेत. कीड-रोगांचा प्रादुर्भाव असलेले, पानांच्या आड, गर्दीत असलेले, एकसारखा आकार नसलेले अतिरिक्त घड काढून टाकावेत. तसेच खराब, कमी आकाराचे, गर्दी करणारे मणी काढून जातीपरत्वे प्रत्येक घडातील मणी संख्या निर्धारित करावी. यामुळे प्रत्येक वेलीवर योग्य घड व मणी संख्या राहून निर्यातक्षम उत्पादन मिळण्यास मदत होईल.

काडी व घडांची बांधणी 
पेपर लावण्याआधी काड्यांची व घडांची बांधणी करून घ्यावी. त्यामुळे पेपर लावणे सोयीचे होईल.

कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी 
एकदा द्राक्ष बागेत पेपर लावल्यानंतर आपण फवारणीद्वारे वापर केलेल्या किटकनाशकांचा घडांशी संपर्क येत नाही. त्यामुळे पेपर लावण्याअगोदर कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषकरून मिलीबगचे (पिठ्या ढेकूण) नियंत्रण करून घ्यावे. यासाठी काढणीपूर्व कालावधीचा विचार करून योग्य त्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी. तसेच व्हर्टीसिलीयम लेकॅनी सारख्या जैविक कीडनाशकांचा वापर शिफारशीनुसार करावा.

बुरशीनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी
द्राक्ष पीक विविध बुरशीजन्य रोगांना उदा. केवडा, भुरी, करपा इ. बळी पडते. यासाठी पेपर लावण्याअगोदर बुरशीनाशकांच्या काढणीपूर्व कालावधीचा विचार करून फवारणी घ्यावी. तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी, बॅसिलस सबटिलीस यासारख्या जैविक बुरशीनाशकांचा वापर महत्त्वाचा ठरतो. यामुळे रोगनियंत्रण होऊन रासायनिक बुरशीनाशकांचे अवशेष कमी होण्यास मदत होईल. अशा प्रकारे सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर कुशल मजुरांद्वारे घडाना इजा न करता, कमीत कमी हाताळणी करून योग्य अवस्थेत पेपर लावण्याचे काम पूर्ण करावे.

द्राक्ष घडांना पेपर लावण्याचे फायदे 

  • द्राक्ष घडांचे उन्हे व त्यामुळे होणाऱ्या जळणे (सन बर्निंग) सारख्या समस्यांपासून संरक्षण होते.
  • घडांचे थंडीपासून संरक्षण होऊन मण्यांचा योग्य आकार मिळण्यास मदत होते.
  • पिंक बेरी या समस्येपासून मुक्तता मिळते. किंबहुना ही समस्या टाळण्यासाठी घडांना पेपर लावणे हा एकमेव उपाय आहे.
  • घडांचे पक्षी, प्राणी यांच्यापासून होणारे नुकसान टाळता येते. 
  • द्राक्ष काढणी वेळी निर्यातीसाठी आवश्यक मण्यांचा आकार, आकर्षक एकसारखा रंग मिळून निर्यातक्षम मालाचे उत्पादन वाढते. 

पेपर लावण्याआधी व नंतर करावयाच्या उपाययोजना 

  • घड व मणी विरळणी 
  • किटकनाशक व बुरशीनाशक यांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर
  • कुशल मजुरांचा उपयोग करून घडांना इजा न करता, कमीत कमी हाताळणी करून पेपर लावावे.
  • पेपर लावल्यानंतर ठराविक काळाने प्रातिनिधिक स्वरूपात घडांची मिलीबग, भुरी इ.साठी तपासणी करावी.

- योगेश भगुरे, ९९२२४१४८७३, (सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, के. डी. एस. पी कृषी महाविद्यालय, नाशिक.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com