कोरोनामुळे राशीनचा नवरात्रोत्सव सुना सुना

दत्ता उकिरडे
Sunday, 18 October 2020

यमाई देवीच्या राऊळासह दुमदुमणारी राशीननगरी आज सुनी-सुनी दिसली. ज्योती घेऊन जाणाऱ्या मंडळाची गर्दी कुठेच पहायला मिळाली नाही. पाहायला मिळाला तो पोलिस बंदोबस्त. कोरोनाने अक्षरशः नवरात्रोत्सवाचे चैतन्य हिरावून घेतले.

राशीन : राज्याचे आराध्य दैवत असलेल्या राशीनच्या यमाईदेवी मंदिरात काल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच जणांच्या उपस्थित पारंपरिक पद्धतीने मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात विधीवत मंत्रोच्चारात पुजारी अरुण रेणूकर, सुनील रेणूकर, डॉ. सुमित शेटे, अॅड.सचिन रेणूकर, ग्रामजोशी संदीप सागडे यांनी घटस्थापना केली. 

यंदा धगधगणाऱ्या मशाली हातात घेऊन, कुंकवाने भरलेले मळवटातील भाविक कुठेच दिसले नाही. कडाडणारी हलगी, झांजा, ढोल- ताशांचा निनाद कोरोनाने गायब केला. उदो बोला उदोच्या टिपेला पोचलेला गजरही आज कोणाच्याही कानावर पडला नाही.

यमाई देवीच्या राऊळासह दुमदुमणारी राशीननगरी आज सुनी-सुनी दिसली. ज्योती घेऊन जाणाऱ्या मंडळाची गर्दी कुठेच पहायला मिळाली नाही. पाहायला मिळाला तो पोलिस बंदोबस्त. कोरोनाने अक्षरशः नवरात्रोत्सवाचे चैतन्य हिरावून घेतले.

असे असले तरी यमाईदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास काल पवित्र वातावरणात प्रारंभ झाला. घरोघरी भाविकांच्या नऊ दिवसांच्या उपवासास घटस्थापना करून प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या देवघरात कोजागरी पौर्णिमेपर्यंत नंदादीप अखंड तेवत राहणार आहे. 

नवरात्रोत्सवाची वैशिष्ट्ये
देवीभक्तांकडून पलंग, गादी, उशी व चपलांचा वापर बंद.
राशीनसह परिसरात  मांसाहार व केशकर्तनलाये बंद.
मुस्लिम बांधवही करतात. नवरात्राचे उपवास.
मंदिरात रोज सकाळी - रात्री धुपारती.
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: राशीनमधील नवरात्रीवरील निराश