गौण खनिज चोरणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या, १४ लाखांचा दंड

14 lakh fine for sand thieves
14 lakh fine for sand thieves

शेवगाव : महसूल विभागाने गेल्या पंधरा दिवसात वाळू, खडी व मुरुमाची अनधिकृतपणे वाहतूक करणा-या १४ वाहनांवर कारवाई करून २६ लाख ६३ हजार ६५० रुपये दंड ठोठावला. त्यातील ९ वाहनांकडून १३ लाख ७८ हजार ९५० रुपये दंड वसुल केल्याची माहिती तहसीलदार अर्चना भाकड यांनी दिली. 

दोन महिने कोरोनासंदर्भातील खबरदारी आणि उपाययोजनात प्रशासन व्यस्त असल्याने व महसूल विभागात प्रभारीराज असल्याने तालुक्यात वाळू,खडी, मुरुम आणि मातीचा बेसुमारपणे उपसा सुरू होता. अनधिकृतपणे सुरू असलेल्या या वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हा व्यवसाय जोमात सुरू होता.

हेही वाचा - पारनेरचे नगरसेवक म्हणताहेत आम्हाला माघारी नाही जायचं

दरम्यानच्या काळात शेवगावला तहसीलदार अर्चना भाकड नव्याने बदलून आल्यानंतर त्यांनी तालुक्यातील वाळूसह इतर गौण खनिज उपसा करणाऱ्याची माहिती संकलन केली. तालुक्यातील नदी, नाले व ओढयांची पाहणी कूली असता अवैधरित्या वाळू व मुरुम उपसा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

कारवाईचे धडक सत्र राबवत त्यांनी गेल्या पंधरा दिवसात त्यांनी क्षमतेपेक्षा जास्त वजनाची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाळूच्या सहा डंपरवर ९ लाख १२ हजार ९५० रुपये, खडीच्या सहा डंपरवर १३ लाख ३१ हजार ५० रुपये तर मुरुमाच्या दोन डंपरवर ४ लाख १९ हजार ६५० अशा एकूण १४ वाहनांवर २६ लाख ६३ हजार ६५० रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यातील ९ वाहनमालकांनी १३ लाख ७८ हजार ९५० रुपये दंड भरला आहे. इतर पाच वाहनमालकांनी अद्याप दंड भरलेला नाही.
    
या कारवाईमुळे वाळूसह मुरुम, माती ,खडीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. शिवाय तालुका महसूल प्रशासनास दिलेले वार्षिक आठ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अशा कारवाईत सातत्य राखणे गरजेचे आहे अन्यथा तो नेहमीप्रमाणे केवळ एक फार्स ठरण्याची शक्यता आहे.

शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदीपात्रातील वाळूला राज्यातून मोठी मागणी आहे. त्यामुळे लिलाव असो वा नसो त्या परिसरातील नदीसह व ओढयानाल्यातून वाळूचा बेसुमार उपसा होतो.

महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत सातत्याने कारवाई केली तर त्यास निश्चित आळा बसेल. वाळू तस्करांच्या सतर्क नेटवर्कमुळे पोलिस किंवा महसूलच्या पथकाच्या कारवाईपूर्वीच कुणकुण लागत असल्याने दरवेळी टाकलेला छापा एक निव्वळ फार्स ठरतो. 

प्रशासनातील खबरे शोधावे लागतील

अवैध वाहतूक करणारी वाहने पकडल्यानंतर जागेवर तडजोड करून सोडून देण्याचे प्रकार यापूर्वी तालुक्यात अनेकदा घडलेले आहेत. शिवाय कारवाईनंतर तहसील किंवा पोलिस ठाण्यात आणलेली वाहने परस्पर सोडून देण्याचे प्रतापही नियमित घडत असतात. त्यामुळे प्रशासनातील अशा खबऱ्यांना शोधण्याचे आव्हान तहसीलदार भाकड यांच्यासमोर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com