नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी! आराखड्यासाठीच 21 कोटी 50 लाख मंजूर

अमित आवारी
Tuesday, 29 December 2020

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना, विकासआराखडा तयार करण्यासाठी तब्बल 21 कोटी 50 लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला.

अहमदनगर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना, विकासआराखडा तयार करण्यासाठी तब्बल 21 कोटी 50 लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. महापालिकेला स्वतःच्या तिजोरीतून हा निधी द्यावा लागणार आहे. विकासकामांना निधी नसताना, केवळ आराखड्यावरच कोट्यवधीची उधळपट्टी सुरू असल्याचे दिसते. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शहरविकास आराखड्यासाठी 21 कोटी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव सभेसमोर होता. त्यावर मुदस्सर शेख, कुमार वाकळे व गणेश भोसले यांनी या कामाचा निधी कोण देणार, त्यातून नगरला काय फायदा, अशी विचारणा केली. त्यावर नगररचनाकार राम चारठणकर म्हणाले, की जलवाहिन्या, रस्ते, गटारींचे प्रमाणीकरण करण्यात येईल. तसेच अतिक्रमणे निश्‍चित होतील. त्यामुळे महापालिकेच्या जमिनीबाबतच्या वादाचे प्रमाण कमी होईल.

मालमत्ताकराला फायदा होईल. या कामासाठी अमृत योजना, विकासभार, 15वा वित्त आयोग, आदी योजनांतून महापालिका निधी देऊ शकते. मात्र, केवळ आराखड्यासाठी एवढा निधी का, या प्रश्‍नावर चारठणकर यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. 

अग्निशामक वाहनखरेदी निविदेला चार वेळा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेच्या निधीतूनच वाहनखरेदीचा प्रस्ताव सभेसमोर मांडला होता. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सांगत, सभापती मनोज कोतकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे अग्निशमन वाहनखरेदीसाठी सर्व सदस्यांनी निवेदन पाठवावे, अशी सूचना केली.

अग्निशमन विभागातील कर्मचारी प्रशिक्षण व संख्येबाबतच्या प्रश्‍नांवर अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ म्हणाले, की सध्या केवळ 28 कर्मचारी असून, पुढील आठवड्यात आउट सोर्सिंगनुसार 20 कर्मचारी भरण्यात येणार आहेत. वित्त व लेखापरीक्षक चंद्रकांत खरात यांच्यावरील कारवाईच्या प्रस्तावाबाबत प्रशासकीय पातळीवर निर्णय घ्यावा, असे सभापती कोतकर म्हणाले. 

ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
प्रकाश भागानगरे, सोनाली चितळे, डॉ. सागर बोरुडे, सहायक आयुक्‍त नितीन राऊत, उपायुक्‍त संतोष लांडगे, नगरसचिव एस. बी. तडवी आदी उपस्थित होते. 

सभापती करणार उपोषण 
शहरातील पथदिव्यांचा प्रश्‍न सुटत नसल्याने, सभापती मनोज कोतकर यांनी महापालिकेसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. महापालिकच्या विद्युत विभागात सध्या अधिकारी नाहीत. शिवाय पथदिव्यांचे साहित्यही महापालिकेकडे नाही. 

आयुक्‍तांच्या गैरहजेरीवर नाराजी 
स्थायी समितीच्या सभेला महापालिका आयुक्‍त नेहमीच गैरहजर राहत असल्याबद्दल नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी नाराजी व्यक्‍त केली. त्यावर सभापती कोतकर यांनी पुढील सभेला आयुक्‍तांनी हजर राहण्याची सूचना केली. मात्र, सध्या आयुक्‍त चार दिवसांनीच निवृत्त होत आहेत. 

खुर्ची मिळेल का खुर्ची? 
स्थायी समितीच्या सभेत खूप दिवसांनंतर सर्व सदस्य हजर होते. त्यामुळे उशिरा येणाऱ्या सदस्यांना खुर्च्या उरल्या नाहीत. त्यामुळे सदस्य येताच कर्मचाऱ्यांची खुर्ची शोधमोहीम सुरू होत होती. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 crore sanctioned for preparation of Municipal Development Plan