esakal | राहुरी कारागृहातील ३१ कैदी कोरोना पॉझिटिव्ह; पाच महिलांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

31 inmates of Rahuri Jail corona positive

राहुरीच्या कारागृहात अखेर कोरोना बॉम्ब फुटला. ज्याची भीती होती तेच घडले. मंगळवारी (ता. १५) तब्बल ३१ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

राहुरी कारागृहातील ३१ कैदी कोरोना पॉझिटिव्ह; पाच महिलांचा समावेश

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : राहुरीच्या कारागृहात अखेर कोरोना बॉम्ब फुटला. ज्याची भीती होती तेच घडले. मंगळवारी (ता. १५) तब्बल ३१ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यात, पाच महिला कैद्यांचा समावेश आहे. आता, राहुरीच्या कारागृहात एक महिला व १३ पुरुष असे अवघे १४ कैदी कोरोना निगेटिव्ह राहिले आहेत. त्यामुळे, पहिल्यांदाच कारागृहातील कोठड्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

बुधवारी (ता. १६) दुपारपर्यंत २६ कैद्यांना नगर येथील जिल्हा कारागृहाच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. पाच महिला कैद्यांना दुपारपर्यंत हलविले नव्हते.
राहुरीचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचा हटवादीपणा कारागृहातील कैद्यांना भोवणार आहे.  कैद्यांना अटक करताना कोरोना तपासणीचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वी त्यांना इतर कैद्यांच्या बरोबर कोठडीत टाकण्याचा अट्टाहास इतरांच्या जीविताला धोकेदायक ठरणार आहे. याविषयी 'सकाळ' मध्ये वारंवार आवाज उठविण्यात आला. परंतु, शिस्तीच्या भोक्त्यांनी अखेर बेशिस्तीचे दर्शन घडविले.

वास्तविक, आवश्यक खबरदारी घेतली. तर, चार भिंतीच्या कडेकोट बंदोबस्तात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचे कोणतेही कारण नाही.  वेळच्या वेळी कोठड्या निर्जंतुकीकरण करणे. न्यायालयात व दवाखान्यात हलविण्यात येणार्‍या कैद्यांना सोशल डिस्टन्सिंग व सॅनीटायझर याचा वापर करणे. आजारी कैद्यांचे विलगीकरण करणे. कैदी व कारागृहाचे सुरक्षा पोलीस कोरोना बाधित होऊ नयेत. यासाठी उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु, तसे घडले नाही.

पंधरा दिवसांपूर्वी अटक केलेल्या दोन कैद्यांना कोरोना अहवाल येण्यापूर्वी कोठडीत टाकले होते. पैकी, एक कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच वेळी, कारागृहात कोरोना संक्रमण होऊन, लवकरच कोरोना बॉम्ब फुटणार. याचे सूतोवाच करण्यात आले होते.

सोमवारी (ता. १४) रात्री आजारी पाच कैद्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे, काल (मंगळवारी) कारागृहातील उर्वरित ४५ कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. पैकी ३१ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

संपादन : अशोक मुरुमकर