
जिल्ह्यात अद्याप "बर्ड फ्लू' स्पष्ट झालेला नसला, तरी कुक्कुटपालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. एखाद्या पक्ष्याचा मृत्यू झाल्यास तत्काळ पशुसंवर्धन विभागाला माहिती द्यावी.
नगर ः ""जिल्ह्यात अद्याप "बर्ड फ्लू'ची नोंद झाली नसली, तरी जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. "बर्ड फ्लू'च्या प्रतिबंधासाठी 78 पथकांची स्थापना केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,'' असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
डॉ. भोसले यांनी आज पशुसंवर्धन व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उपवन संरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, डॉ. अनिल बोरगे, डॉ. दादासाहेब साळुंखे, बी. एन. शेळके, डॉ. राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील एकूण पशुधन, कोंबड्यांची संख्या, जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मची संख्या आदींचा आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात अद्याप "बर्ड फ्लू' स्पष्ट झालेला नसला, तरी कुक्कुटपालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. एखाद्या पक्ष्याचा मृत्यू झाल्यास तत्काळ पशुसंवर्धन विभागाला माहिती द्यावी.
तपासणीनंतर पक्ष्यांची योग्य विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे. पोल्ट्री फार्मची स्वच्छता महत्त्वाची आहे. मृत पक्ष्यांना खोल खड्ड्यात पुरण्यात यावे. बर्ड फ्लू रोखण्यासाठी www.dahd.nic.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असल्याचे डॉ. भोसले म्हणाले. अहमदनगर
संपादन - अशोक निंबाळकर