एका क्लिकवर विद्यार्थ्याची कुंडली; नेवासेत ८२ टक्के विद्यार्थी आधार नोंदणी

सुनील गर्जे
Saturday, 5 December 2020

शाळेतील पटसंख्या विविध योजनांची 'विरुद्ध तपासणी' करण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी केली जाते.

नेवासे (अहमदनगर) : विद्यार्थ्यांना मिळणारे शैक्षणिक लाभ, शालेय पोषण आहार, विद्यार्थी संख्येनुसार मान्य होणारी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पद निश्चिती, शाळेतील पटसंख्या विविध योजनांची 'विरुद्ध तपासणी' करण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी केली जाते.

नेवासे तालुक्यात यु-डायसवर नोंदणी झालेल्या ७६ हजार ४७ पैकी ६२ हजार ४७९ विद्यार्थ्यांची म्हणजेच ८२.१७ टक्के आधार नोंदणीचे काम झाले आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारी शिष्यवृत्ती, शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या, शासनाकडून मिळणारे आहार, शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतो अथवा नाही याची पडताळणी एका क्लिकवर शिक्षण विभागाला उपलब्ध व्हावी, या अनुषंगाने हा आराखडा तयार केला जात आहे.

विद्यार्थ्यांच्या पटसंख्येतील बयोगसपणा कमी होण्यासाठी आता विद्यार्थी पटसंख्यासुद्धा आधार नोंदणीवर करणार आहे. सध्या आधार कार्ड तपासणीचे निर्देश मुख्याध्यापकांनी शिक्षकांना दिले आहेत. सर्व माध्यमांच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आधार याद्वारे अपडेट करण्यात येत आहेत.

तालुक्‍यात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा एकूण ३६१ शाळा, महाविद्यालय आहेत. आतापर्यंत एकृण नोंद असलेल्या ७६ हजार ४७ विद्यार्थ्यांपैकी ६२ हजार ४७९ विद्यार्थ्यांचे आधार अपलोड झाले आहे. हे एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ८२.१७ टक्के असून, उर्वरित १३ हजार ५५८ विद्यार्थ्यांचे आधार अपलोडिंगचे काम लॉकडाऊनमुळे सुरू होऊ शकलेले नाही. परंतु, येत्या काही दिवसात ही प्रक्रिया वेग घेईल असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

नव्याने नोंदणी व दुरुस्ती होणार 
ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही, त्यांचे नाव नव्याने नोंदणी केले जाणार आहे. तसेच नाव, पत्ता, जन्मतारीख बदल असल्यास त्याची दुरुस्ती  देखील या मोहिमे दरम्यान केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. 

तालुक्यातील सर्व माध्यमाच्या जिल्हा परिषद, खाजगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे  आधार नोंदणीचे काम ८२ टक्‍के  झाले आहे. लॉकडाऊनमुळे या कामात काही प्रमाणात अडथळा निर्माण  होता.  मात्र उर्वरित नोंदणी लवकरात लवकर करण्यात येईल. 
- सुलोचना पटारे, गट शिक्षणाधिकारी, नेवासे 

नेवासे शिक्षण विभाग दृष्टीक्षेपात...

  • एकूण शाळा : 361
  • प्राथमिक :  253
  • माध्यमिक :  107 
  • उच्च माध्यमिक :  15
  • महाविद्यालय :  05
  • एकूण विद्यार्थी : 76047  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 82 percent student Aadhar registration in Nevasa taluka