esakal | संगमनेर तालुक्यातून पुण्यासाठी धावल्या ऐवढ्या एसटी बस
sakal

बोलून बातमी शोधा

820 ST buses ran in Sangamner taluka today

राज्यभरातील आंतरजिल्हा वाहतुकीसाठी आज एसटी बस सुरु करण्याच्य़ा परिवहन मंत्र्यांच्या घोषणेनंतर, नगर जिल्ह्यातील संगमनेरमधील हायटेक बसस्थानकातून दुपारी एक बस पुण्याकडे रवाना झाली.

संगमनेर तालुक्यातून पुण्यासाठी धावल्या ऐवढ्या एसटी बस

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : राज्यभरातील आंतरजिल्हा वाहतुकीसाठी आज एसटी बस सुरु करण्याच्य़ा परिवहन मंत्र्यांच्या घोषणेनंतर, नगर जिल्ह्यातील संगमनेरमधील हायटेक बसस्थानकातून दुपारी एक बस पुण्याकडे रवाना झाली.

कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पूर्वी अवघ्या पाच महिन्यांपूर्वी सातत्याने एसटी बसची वर्दळ असलेल्या, राज्यभरातील विविध प्रमुख शहरांकडे सुसाट धावणाऱ्या एसटी बस संगमनेरला काही वेळ थांबत असत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे पाच महिन्यांपासून एसटीचे चाक जागीच रुतले आहे. 
नाशिक, पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संगमनेर बसस्थानकातून मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील सर्व प्रमुख शहरे व जिल्हा, तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नित्य दळणवळणाची व्यवस्था होती. केवळ संगमनेर आगाराच्या दिवसभरात एक हजार 850 फेऱ्या सुरु होत्या.

आंतरराष्ट्रीय तिर्थस्थळ असलेली शिर्डी, शनिशिंगणापूर या दोन देवस्थानांकडे जाणाऱ्या भाविकांची गर्दी या ठिकाणी दिसत असे. तसेच पंढरपूरची यात्रा किंवा जेजूरीसाठी विशेष गाड्यांची सोय असल्याने बाहेरील तसेच स्थानिक प्रवाशी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हे बसस्थानक भरुन जात असे. 

प्रवाशांच्या सेवेसाठी संगमनेर आगाराकडे 4 शिवशाही, 2 निमआराम, 2 विठाई तसेच 56 परिवर्तन (साध्या) असा 64 बसगाड्यांचा ताफा आहे. राज्यातील सर्वात हायटेक व सुविधायुक्त बसस्थानक म्हणून संगमनेरचा उल्लेख होतो.

आजपासून एसटीची सेवा सुरु झाली असली तरी, प्रवाशी नसल्याने सर्वत्र सामसुम होती. सकाळी फलाटावर लावलेली पुण्याकडे जाणारी बस दुपारी सव्वाबाराला अवघे 21 प्रवासी घेवून पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर पहिली बस रवाना झाली. तर पुणे आगाराची शिर्डी पुणे बस अवघा एक प्रवासी संगमनेरला सोडून पुढे निघून गेली. प्रवाशांनी आज प्रतिसाद न दिल्याने, आजपासून सुरु झालेली बससेवा पूर्ववत होण्यास काही अवधी लागणार आहे.

संगमनेरचे आगार प्रमुख बाबासाहेब शिंदे म्हणाले, परिवहन महामंडळाच्या एसटी बससद्वारे प्रवास करण्यासाठी 22 प्रवाशांच्या गटाने मागणी केल्यास, राज्यातील कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी तात्काळ सेवा उपलब्ध करुन देणार आहोत.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top