
Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षांची शिक्षा
अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल नीलेश राजू झेंडे (वय २२, रा. गेवराई रोड, शेवगाव) याला २० वर्षे सक्तमजुरीची आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त व विशेष (पोक्सो) जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी ठोठावली. ॲड. मनिषा केळगंद्रे - शिंदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
अल्पवयीन मुलगी ही दहावी वर्गात शिक्षण घेत होती. मुलीला ता.४ एप्रिल २०२२ रोजी घरातून नीलेश झेंडे याने पळविले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी गुन्ह्याचा तपास केला. नीलेश हा मुलीला घेऊन गणपती माथा (वारजे, पुणे) येथे राहत होता.
मुलीने दिलेल्या जबाबानुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी, मुलीचे वडील, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी, वयासंदर्भात नगर परिषद शेवगावचे माहितगार इसम व मुख्याध्यापक यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. साक्षी पुरावे आणि कागदोपत्री पुरावा व युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस न्यायालयाने शिक्षा ठोठावली. पोलिस अंमलदार विजय गावडे व आर. व्ही. बोर्डे यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.