esakal | मोकाटाच्या वाढीमुळे अपघात व कोंडी ... शेवगावकरांची डोकेदुखी वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

Accidents and conundrums due to Mokata's rise ... Shevgaonkar's headaches increased

भाजीबाजारातील भाज्यांचे अवशेष, कचऱ्याचे ढीग, हॉटेलमधील शिल्लक खाद्यपदार्थांवर ती गुजराण करतात. मिरी रस्त्यावर आंबेडकर चौकापासून थेट इरिगेशन कॉलनीपर्यंत ही जनावरे ठाण मांडून बसतात.

मोकाटाच्या वाढीमुळे अपघात व कोंडी ... शेवगावकरांची डोकेदुखी वाढली

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव : शहरातील मोकाटांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मोकाटांकडून वर्दळीच्या ठिकाणी येऊन नासधूस केली जात आहे. त्यामुळे ती नागरिकांसह प्रवाशांसाठी डोकेदुखी बनली आहेत. प्रमुख रस्त्यांवर वाहनांची तमा न बाळगता दिवसभर ठाण मांडून बसलेल्या मोकाटांच्या झुंडीमुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. 

हेही वाचा ः  "बांधकाम'मधून "त्याचे'  बस्तान शिक्षण विभागात 

शहरातील सर्वच प्रभागांत शेकडोंच्या संख्येने मोकाट जनावरे आहेत. यातील बहुतांश जनावरे नागरिकांनी पाळलेली आहेत. ती चरण्यासाठी शहरात दिवसभर सोडून दिली जातात. भाजीबाजारातील भाज्यांचे अवशेष, कचऱ्याचे ढीग, हॉटेलमधील शिल्लक खाद्यपदार्थांवर ती गुजराण करतात. मिरी रस्त्यावर आंबेडकर चौकापासून थेट इरिगेशन कॉलनीपर्यंत ही जनावरे ठाण मांडून बसतात.

अवश्य वाचा ः घरचं झालं थोडं.. 

आधीच अरुंद रस्ते, त्यांवर अस्ताव्यस्त उभी वाहने, यातून मार्ग काढणाऱ्या वाहनचालकांचे हाल होतात. पावसाळ्यात तर ही जनावरे डांबरी रस्त्याच्या मधोमध बसतात. वाहनांच्या हॉर्नलाही जुमानत नाहीत. शिवाय, जनावरांच्या टकरीमुळे पायी जाणाऱ्यांना पळता भुई थोडी होते.

अचानक रस्त्यावर आलेल्या जनावरांमुळे चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होतात. शहरातील शास्त्रीनगर, खंडोबानगर, आखेगाव रस्ता, खंडोबा मैदान येथेही मोकाट जनावरांची संख्या वाढत आहे. 
शहर परिसरातील वरूर, भगूर, वडुले, गुंजाळ वस्ती, सागडे वस्ती, आरे वस्ती, लांडे वस्ती, माळीवाडा, गहिले वस्ती येथील शेतातील उभ्या पिकांत घुसून जनावरे मोठे नुकसान करतात. अशा जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी नगरपरिषदेकडे अनेकदा केली. मात्र, अशा जनावरांवर नगरपरिषदेकडून काहीही कारवाई केली जात नसल्याने शहरवासीयांना मुक्तपणे फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा त्रास सहन करावा लागतो. 


दिवसा शहरभर भटकणारी जनावरे रात्री आपोआप मालकांच्या गोठ्यात आश्रयाला जातात. त्यामुळे ही जनावरे मोकाट आहेत की कोणाच्या मालकीची, असा प्रश्न नागरिकांना पडतो. जनावरे सकाळी शहरात सोडून दिल्यानंतर त्यांच्या चारा-पाण्याचा खर्च व कष्ट वाचत असल्याने, अशी जनावरे पाळण्याकडे अनेकांचा कल आहे. याकडे नगरपरिषदेने लक्ष द्यावे. 
- महेश पुरनाळे, ग्रामस्थ, आखेगाव रस्ता, शेवगाव 
.... 
जनावरे मोकाट सोडणाऱ्या नागरिकांना नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. मात्र, कारवाई करूनही पुनःपुन्हा असे प्रकार घडत आहेत. यापुढे शहरातील मोकाट जनावरे पकडून गो-शाळेत पाठविण्यात येतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. 
- अंबादास गर्कळ, मुख्याधिकारी, नगरपरिषद, शेवगाव , अहमदनगर
 

                         -संपादन ः दौलत झावरे