नेवाशात १०३ ग्रामपंचायतींचा कारभार कागदावरच ! ११ ग्रामपंचायती पेपरलेस, ३३ प्रकारचे दाखले मिळतात ऑनलाईन

सुनील गर्जे
Thursday, 14 January 2021

तालुक्यात ११४ ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी दस्ताऐवजांच्या नोंदणीचे काम ग्रामसेवकांकरवी करण्यात येते.

नेवासे (अहमदनगर) : राज्य शासनाने आपले सरकार योजनेत ई-ग्रामसॉफ्ट ही संगणक प्रणाली तयार केली आहे. आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत नेवासे तालुक्यातील ११४ पैकी केवळ ११ ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या आहेत. मात्र उर्वरित तब्बल १०३ ग्रामपंचायतींचा कारभार अजूनही जुन्याच पद्धतीने कागदांवर सुरू आहे. यातील ७० टक्के  ग्रामपंचायतीचे कामकाज पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

ग्रामीण परिस्थितीवर मात करीत तालुक्यातील ११ ग्रामपंचायती पेपरलेस झाले आहेत. या ग्रामपंचायतीची सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. योजनेतील ई-ग्रामसॉफ्ट नावाची संगणक प्रणाली बनविली आहे. त्यामुळे संबंधित ग्रामस्थांना मालमत्ता कर, रहिवासी, वीज जोडणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र, शौचालय दाखला, विवाह नोंदणी दाखला, हयातीचा दाखला, वयाचा दाखला असे विविध ३३ प्रकारचे दाखले ग्रामपंचायतीमधून ऑनलाईन प्राप्त होत आहेत. आर्थिक व्यवहारासह विविध नोंदी संगणकावर सुरू झाल्या आहेत. यासाठी ग्रामपंचायतीचे १ ते ३३ प्रकारचे नमुने संगणकाद्वारे देण्यासाठी ग्रामविकास विभागाने आपले सरकारच्या सेवा केंद्रातील ई-ग्रामसॉफ्ट विकसित केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या आहेत अडचणी

तालुक्यात ११४ ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी दस्ताऐवजांच्या नोंदणीचे काम ग्रामसेवकांकरवी करण्यात येते. दस्ताऐवज अपडेट झाल्यानंतर ग्रामपंचायत पेपरलेस होईल. अनेक गावांमध्ये नेटवर्कचे कारण पुढे आले आहे. पेपरलेस ग्रामपंचायत करण्यासाठी प्रयत्न होत असताना कधी सर्व्हर डाऊन तर कधी नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळत नाही. या कारणाने ग्रामपंचायत पेपरलेस करण्यास अडचणी येत असतात. 

पारदर्शक सेवेसाठी पेपरलेस प्रणाली अत्यंत योग्य आहे. यामुळे कामे वेळेवर होत आहे. तालुक्यात ही संकल्पना संपूर्ण ग्रामपंचायतींनी राबवावी, यासाठी गट विकास अधिकारी शेखर शेलार यांच्या मार्गदर्शनात आमचा विभाग आपले सरकार केंद्राला मदत करत आहे. 
- नवनाथ पाखरे, विस्तार अधिकारी, (ग्रामपंचायत) नेवासे

केंद्र शासनाच्या ई-ग्राम अभियानांतर्गत ग्रामपंचायतीचे कामकाज राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून कामे हाती घेतली आहे. तालुक्यात ११ पेपरलेस तर ४१ ग्रामपंचायतींचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. तर उर्वरित ग्रामपंचायतींचेही कामे प्रगतीपथावर आहे.
- गोरक्षनाथ डोहोळे, प्रमुख, आपले सरकार केंद्र, नेवासे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The administration of 103 gram panchayats in Nevasa taluka is still going on in the old manner