नगर-सोलापूर रस्त्याच्या भरपाईसाठी रास्ता रोको

नीलेश दिवटे
Thursday, 29 October 2020

आज नगर सोलापूर मार्गावर याच राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामा करता भूसंपादन करण्यात आलेल्या विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच कामगार तलाठी व कृषी सहाय्यक यांचे चुकीचे धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

कर्जत: तालुक्यातील पाटेगाव येथे नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात विस्थापित झालेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एड. कैलास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली नगर सोलापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या वेळी फेर पाहणी,मूळ दस्तऐवज व इतर तपासणी नंतर उचित कार्यवाही करण्यात येईल येईल असे आश्वासन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी अनिल भापकर, कृषी पर्यवेक्षक भरत गाढवे व नवनाथ जत्ती, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक एड.हर्ष शेवाळे, सरपंच गोकुळ ईरकर, परशुराम देवकर, बाळासाहेब भंडारे, गजेंद्र शेवाळे सुनील जाधव ,अशोक भोसले आदी सह ग्रामस्थ,शेतकरी उपस्थित होते.

आज नगर सोलापूर मार्गावर याच राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामा करता भूसंपादन करण्यात आलेल्या विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच कामगार तलाठी व कृषी सहाय्यक यांचे चुकीचे धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्यांच्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी तसेच भूसंपादन झालेल्या पात्र लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या वेळी आंदोलकांनी केली.

यावेळी एड.कैलास शेवाळे म्हणाले नगर-सोलापूर मार्गासाठी संपादित जमिनीसाठी काही ठिकाणी वापरण्यात आलेला चुकीचा नकाशा दुरुस्त करून पात्र लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी,तसेच संपादित जमिन संपादनामुळे झालेले विस्थापित कुटुंब यांना योग्य न्याय व नुकसानग्रस्त शेतकरी यांचे तत्काळ नुकसानीचे पंचनामे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.

या वेळी हर्ष शेवाळे यांचे भाषण झाले .गोकुळ ईरकर यांनी आभार मानले पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation in Karjat for compensation of Nagar-Solapur road