Ahmednagar : द्राक्षबागायतदारांना सव्वा कोटीचा गंडा,व्यापारी ‘नॉट रिचेबल’; पोलिस अधीक्षकांची घेतली भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar

Ahmednagar : द्राक्षबागायतदारांना सव्वा कोटीचा गंडा,व्यापारी ‘नॉट रिचेबल’; पोलिस अधीक्षकांची घेतली भेट

श्रीगोंदे - श्रीगोंदे व कर्जत तालुक्यांतील द्राक्षबागायतदारांना व्यापाऱ्यांनी तब्बल सव्वा कोटी रुपयांना गंडा घातला आहे. दीड महिन्यापूर्वी, द्राक्ष घेऊन गेल्यानंतर चार-पाच दिवसांत पैसे देतो, असे सांगणाऱ्या व्यापाऱ्यांचे आठ दिवसांपासून मोबाईल बंद असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली.

तालुक्यातील श्रीगोंद्यासह, बेलवंडी, हंगेवाडी, बोरी, पारगाव सुद्रिकसह कर्जत तालुक्यातील राशीन व रुईगव्हाण येथील बावीस शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. मार्च व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशिक व मुंबई येथील व्यापाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या द्राक्षांचा शेतात सौदा केला.

माल घेऊन गेल्यावर चार ते पाच दिवसांत पैसे देण्याचे ठरले होते. मात्र, दीड महिना होत आला तरीही व्यापारी पैसे देत नव्हते. शेतकऱ्यांनी जास्त तगादा लावल्यावर सदर व्यापारी मोबाईल बंद करून गायब झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रितरीत्या आज (शुक्रवारी) पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत संबंधित व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकल्यावर अधीक्षक ओला यांनी श्रीगोंदे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी दिली. आज सांयकाळी उशिरा हे शेतकरी फिर्याद देत आहेत.

टॅग्स :FarmerGrapes