
Ahmednagar : प्रथम प्रश्न सोडवा नंतर देवदेव करा ; बाळासाहेब थोरात
संगमनेर : अतिवृष्टी व गारपिटीने झालेल्या प्रचंड नुकसानीच्या भरपाईपोटी राज्य सरकार काय देणार हे अद्याप जाहीर झाले नाही. महाराष्ट्र हे कुटुंब समजून मुख्यमंत्र्यांनी प्रथम ते कर्तव्य पार पाडावे, नंतर देवदेव करण्यास हरकत नाही, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
राज्याच्या सद्यःस्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले विचार केवळ एका राज्यापुरते नाहीत, तर देश कुठे चाललाय, यावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. धर्माचा ज्याने त्याने त्याच्या पद्धतीने अवलंब करावा. मात्र, राजकारण आणि धर्म यांची सरमिसळ केल्यास देशाची प्रगती खुंटते, हे सर्वोच्च न्यायालयाचे वक्तव्य असल्याचे ते म्हणाले.
थोरात कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की मुख्यमंत्र्यांचे अयोध्येला जाणे हा त्यांचा वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न आहे. मात्र, कुटुंब अडचणीत असताना देवदेव करीत फिरणे, असे होऊ नये. सरकारने साडेतीनशे रुपये दराने कांदा खरेदी करणार असल्याचे सांगितले होते, मात्र अजूनही नाफेड ॲक्टिव्ह झालेली दिसत नाही.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करावा, या मागणीसाठी सदनाच्या पायऱ्यांवर आम्ही बसलो, सभागृहात प्रचंड आग्रह धरल्याने त्यांनी सकारात्मक उत्तरे दिली. आता ती मदत मिळाली असती तर नवे पीक करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार मिळाला असता. मात्र, उत्तर सकारात्मक आणि कार्यवाही नकारात्मक, अशी परिस्थिती आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेबाबत बोलताना ते म्हणाले, की शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी राज्य शासन व पोलिसांची आहे. सभा घेण्याचा आमचा लोकशाहीचा अधिकार आहे. त्यानुसार महाविकास आघाडीची भव्य सभा होणार आहे.
- बाळासाहेब थोरात,आमदार, कॉंग्रेस