अहमदनगर : बेलापूर ग्रामपंचायतीची शंभरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat

अहमदनगर : बेलापूर ग्रामपंचायतीची शंभरी

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीचा शताब्दी सोहळा नुकताच साजरा केला गेला. गत शंभर वर्षांकडे मागे वळून पाहताना अनेक स्थित्यंतरांचा ठेवा जपत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा झालेला विकास व त्या माध्यमातून उभी राहिलेली विकासकामे येथील ग्रामपंचायतीने दिलेल्या नेतृत्वाची साक्ष आजही देत आहेत.

ब्रिटिश राजवटीत एक ऑगस्ट १९२२ रोजी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीची स्थापना झाली. यावेळी श्रीरामपूर नव्हे, तर राहुरी तालुका असलेले हे गाव गुळाची सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जात होते. गावाला अकराशे वर्षांचा इतिहास आहे. दिवंगत पेमराज मुथा यांनी प्रथम सरपंचपद भूषविले. त्यानंतर जयवंतराव नाईक, शंकरलाल खटोड, भाऊराव नाईक, शंकरराव नाईक, रामविलास सोमाणी यांनी आपापल्या काळात सरपंचपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळून गावाच्या वैभवात भर घातली. भागवतराव खंडागळे हे सलग अठरा वर्षे, तर मुरलीशेठ खटोड यांनी सर्वाधिक २२ वर्षे सरपंच होण्याचा मान मिळविला. आता महेंद्र साळवी यांनी गावाच्या विकासासाठी कंबर कसली आहे.

ग्रामपंचायतीची स्थापना झाली त्यावेळी निधी मिळत नव्हता. ब्रिटिशांनी हरेगाव येथे साखर कारखान्याची निर्मिती केली. त्यालाही बेलापूर कंपनी हेच नाव देण्यात आले होते. भागवतराव खंडागळे यांच्या कार्यकाळात १९६४ मध्ये साठवण तलावासह पाणीपुरवठ्याची योजना गावासाठी मंजूर होऊन ती पूर्णत्वास गेली. १९६२ मध्ये ग्रामपंचायतीला नवीन इमारत मिळाली. आजही याच इमारतीतून ग्रामपंचायतीचा कारभार चालविला जातो. ग्रामपंचायतीने १९६२ मध्ये सुरू केलेले वाचनालय आजतागायत सुरू आहे.

खटोड यांच्या कार्यकाळात वाड्या-वस्त्यांवर टाक्यांसह पाणीपुरवठ्याची सोय झाली. बेलापूर- श्रीरामपूर रस्त्यावर पथदिव्यांची उभारणी झाली. अंतर्गत रस्त्यांसह मुलींची दुमजली शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, खटकळी येथे बंधारा, समाजमंदिर, अशी विकासकामे झाली. बेलापूरहून राहुरीकडे जाण्यासाठी १९६४ मध्ये प्रवरा नदीवर पूल बांधण्यात आला. गावाला जसा विकासाचा इतिहास आहे, तसाच धार्मिक वारसाही आहे. गावात चौमुखी हनुमान मंदिर, मूर्ती असलेले शनिमंदिर, केशव-गोविंद मंदिर, चक्रधर स्वामींचे वास्तव्य लाभलेला महानुभाव आश्रम असून, येथे त्यांनी लीळाचरित्राचा काही भागही लिहिला आहे. जामा मशीद व जैन समाजाची दोन स्थानकेही आहेत. धार्मिक सलोखा साधत गावाने नेहमीच विकासाची कास धरली आहे. ग्रामपंचायतीने शंभरी पूर्ण केल्याने आता गावपुढाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे.

अन् हरिहरनगर झाले रामगड

तत्कालीन पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांनी १९७२ मध्ये राबविलेल्या २० कलमी कार्यक्रमादरम्यान गावाजवळच हरिहरनगर नावाने नवीन वसाहत करण्यात आली. त्यानंतर आलेल्या ‘शोले’ सिनेमात बेलापूर व रामगड या गावांच्या असलेल्या उल्लेखावरून हरिहरनगरचे पुढे रामगड हे नाव प्रचलित झाले.

Web Title: Ahmednagar Belapur Gram Panchayat Hundred Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..