नगरचे अमरधाम फुल्ल ः मिळेल तेथे कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार, तीन-तीन दिवसांचे वेटिंग

Ahmednagar Cemetery Full
Ahmednagar Cemetery Full

नगर ः महापालिकेच्या नालेगाव अमरधाममध्ये काल (शनिवारी) रात्री कोरोनाबाधित 23 पेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्युतदाहिनीत बिघाड झाल्याने अमरधाममध्ये अक्षरश: मिळेल तेथे कर्मचाऱ्यांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. हा प्रकार समोर आल्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. 

मागील तीन महिन्यांपासून कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेच्या अमरधाममधील विद्युतदाहिनी व ओट्यांची संख्या अपुरी पडत आहे. विद्युतदाहिनीतील बिघाडामुळे सातत्याने अडथळे येत आहेत. अंत्यविधीसाठी दोन-दोन दिवस थांबावे लागत आहे. त्यातून मृतदेहांची विटंबना होत आहे. 

काही दिवसांपूर्वी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी एका शववाहिनीत 12 मृतदेह एकावर एक रचल्याचे जनतेसमोर आणले होते. त्यानंतर आता, कर्मचाऱ्यांनी शनिवारी (ता. 22) रात्री अमरधाम परिसरात जागा मिळेल तेथे अंत्यसंस्कार केल्याचे समोर आले आहे. तसेच मृतांच्या शरीरावरील कपडे इतस्ततः विखरून पडलेले असतात. मृतांच्या अस्थी घेण्यासाठीही नातेवाईक येत नाहीत. त्यामुळे या अस्थी या परिसरातच विखुरलेल्या अवस्थेत पडून होत्या. 

शिवसेनेचे शहरातील पदाधिकारी व नगरसेवकांनी आज अमरधाममध्ये जाऊन याबाबत पाहणी केली. त्यानंतर महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना निवेदन देऊन, महापालिका प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, गिरीश जाधव, दत्ता जाधव, परेश लोखंडे, विशाल वालकर, मनीष गुगळे, संजय वल्लाकट्टी आदी उपस्थित होते. 


महापालिकेत केवळ आयुक्‍तच काम करीत आहेत. उपायुक्‍त व वैद्यकीय आरोग्य अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. अमरधाममधील विद्युतदाहिनी तातडीने सुरू करावी. 
- बाळासाहेब बोराटे, नगरसेवक 

अमरधाममध्ये नवीन विद्युतदाहिनी सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन दिवसांत ती सुरू झाल्यावर ही समस्या दूर होईल. 
- श्रीकांत मायकलवार, आयुक्‍त, महापालिका 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com