
Ahmednagar News: सत्ताधाऱ्यांचा पराभव हेच धेय्य ; माजी आमदार चंद्रशेखर घुले
शेवगाव : जोपर्यंत आपण शांत आहोत, तोपर्यंत शांत आहोत. पण यापुढे थांबणार नाही. तालुक्याच्या अस्मितेचा व मातीचा इतरांच्या राजकारणासाठी उपयोग होऊ देणार नाही.
मागील साडेसात वर्षांपासून सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या व भावनिक राजकारण करुन मूळ प्रश्न बाजूला सारणाऱ्या लोकप्रतिनिधींचा पराभव करणे हेच आपले यापुढील ध्येय आहे.
त्यासाठी कार्यकर्त्यांनी मतभेत विसरून कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले. शेवगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे, माजी आमदार पांडुरंग अभंग, संदीप वर्पे, राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ताठे, अरुण लांडे, गणेश गव्हाणे, संजय फडके, बाळासाहेब जगताप, मयूर वैद्य, गणेश गव्हाणे आदी प्रमुख उपस्थित होते.
चंद्रशेखर घुले म्हणाले की, सत्तेचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी करायचा, हे स्व. मारुतराव घुले यांचे संस्कार आपल्यावर आहेत. त्यामुळे आपण कुठल्याच पदाचा अपेक्षेने कधीही काम केले नाही.
मतदारसंघात आपल्या कार्यकाळात झालेली कामे अजूनही जनतेसमोर आहेत. गेल्या सात-आठ वर्षांत विकासकामांचा निव्वळ आभास करण्यात आला. या कामांचा पर्दाफाश आपण तालुक्यात संघर्ष यात्रा काढून गावोगावी करणार आहोत.
नुसती आपसात भांडणे लावून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचे काम करणा-या लोकप्रतिनिधींची आपण यापुढे पोलखोल करणार आहोत.
राज्य सरकारच्या पराभवाची नांदी पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीतून झाली आहे. पाथर्डीतील कसब्यातून आपल्याला मतदारसंघात परिवर्तनाची नांदी आणायची आहे.
ॲड. ढाकणे म्हणाले की, जिल्हा बँकेत गद्दारी करणारांना पक्षाने जाब विचारला पाहिजे. आपला वाद विचार आणि तत्वांचा आहे. मात्र अशा पद्धतीने कोणी ताटातले हिरावणार असेल, तर यापुढे आम्हालाही जिल्ह्यात हस्तक्षेप करता येईल.
जिल्हा बँकेत सुरू झालेले पक्षीय राजकारण वेदनादायक आहे. यावेळी राष्ट्रवादी युवकच्या तालुकाध्यक्षपदी नंदकुमार मुंढे यांची निवड करण्यात आली. तालुक्यामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या संघर्षयात्रेचा प्रारंभ श्रीफळ वाढवून झाला. प्रास्तविक संजय कोळगे यांनी तर सूत्रसंचालन दीपक कुसळकर यांनी केले.
घड्याळातील काट्यांनी आपण घड्याळ चालवतो, या भ्रमात राहू नये. बॅटरीमुळे घड्याळ चालते आणि ही बॅटरी अजून घड्याळातच आहे.
शेवगाव-पाथर्डीतील घुलेंची ताकद परिवर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याला दाखवून देण्याची वेळ आली आहे. जिल्हा बँकेतील भाऊंच्या पराभवामुळे तीन तालुक्यांसह जिल्ह्याचे व बँकेचे नुकसान झाले आहे.
- क्षितिज घुले, माजी सभापती
सक्रिय होण्याचे सूतोवाच
जिल्हा बँकेतील पराभवानंतर घुले यापुढे काय राजकीय भूमिका घेतात, यासाठी आजच्या मेळाव्याकडे संपूर्ण लक्ष लागून होते.
मात्र घुले यांनी जिल्हा बँकेतील पराभवाबाबत व राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीबद्दल एक शब्दही न बोलता संपूर्ण भाषणात फक्त आमदार राजळे यांनाच लक्ष्य केले. त्यावरून पुन्हा एकदा मतदारसंघात सक्रिय होण्याचे सूतोवाच त्यांनी या माध्यमातून केले आहे.