Ahmednagar : महाविकास आघाडीचा नेता कोण ? ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

Ahmednagar : महाविकास आघाडीचा नेता कोण ? ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहमदनगर - ‘तुम्ही तिघे एकत्रित आलात हे ठीक आहे हो. पण तुमचा नेता कोण, असा सवाल करतानाच, त्यांचे वसुली सरकार होते, तर आमचे सरकार जनतेचे असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) येथे केला.

येथील कोहिनूर मंगल कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना फडणवीस बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘भाजप जगातला सर्वांत मोठा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वैश्विक नेतृत्व आहे. त्यांना जो सन्मान मिळतोय, तो देशाचा सन्मान आहे. मोदी यांच्यामुळेच नगर जिल्ह्यातील तब्बल ७० हजार कुटुंबांना घरे मिळाली. रस्ते, गॅस सिलिंडर, शौचालये, मुद्रा लोनच्या माध्यमातून अनेकांच्या हातांना काम मिळाले.’’

महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा समाचार घेताना फडणवीस यांनी आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की आघाडीचे सरकार हे वसुली सरकार होते. आम्ही आता शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देत आहोत. प्रत्येक योजनेचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होत आहे. चाळीस चोर एकत्र आले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते हरवू शकत नाहीत.

आघाडीत सध्या खुर्चीवर बसण्यावरून वाद सुरू आहेत. ते कधीच एकत्र राहू शकत नाहीत. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हेच त्यांनी केले असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी आभार मानले.

शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज

नगरच्या शेतकऱ्यांना यापुढे दिवसा १२ तास वीज मिळणार आहे. त्यासाठी मोठा सौरऊर्जा प्रकल्प जिल्ह्यात उभारला जाणार आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे. त्याचबरोबर ‘जलयुक्त शिवार २’ अंतर्गत २५७ गावांमध्ये जलसंवर्धनाचे काम सुरू केले जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

नाराज व्हायचं नसतं : फडणवीस

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरून आमदार राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात धुसफूस सुरू आहे. त्याचे पडसाद मेळाव्यात उमटले. पहिले भाषण झाले ते आमदार शिंदे यांचे. ‘पेल्यातले वादळ पेल्यातच राहू द्या. पण फडणवीस साहेब, तुम्हाला जिल्ह्यात लक्ष घालावे लागेल,’ असे त्यांनी जाहीर सांगितले. त्यानंतर विखे यांचे भाषण झाले. ते म्हणाले, की याआधीची जबाबदारी माझीच होती आणि पुढेही ती माझीच राहील. त्यामुळे ‘रामभाऊ’, तुम्ही काळजी करू नका. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, की छोट्या-छोट्या गोष्टींवर नाराज व्हायचं नसतं.

पक्षासाठी एक वर्ष द्या

भाजपच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी एक वर्ष पक्षासाठी द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा आल्यानंतर देश पुढची अनेक वर्षे कधीच मागे वळून पाहणार नाही. भारत महासत्ता होणार आहे. सेतू होऊन कार्यकर्त्यांनी काम करावे. सरकारी योजना तळागाळापर्यंत पोचवाव्यात, असे आवाहन फडणवीस यांनी केले.