Ahmednagar : ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व सूर्यदत्ता ग्रुपतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना सायकल वाटप Ahmednagar Distribution of bicycles Ahmednagar Distribution of bicycles Social Foundation and Suryadatta Group | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 सायकलींचे वाटप

Ahmednagar : ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व सूर्यदत्ता ग्रुपतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना सायकल वाटप

अकोले : तालुक्यातील राजूर परिसरातील वाडी-वस्तीवर राहणाऱ्या मुलांना ऊन, वारा, पावसाचा सामना करत शाळेत जाण्यासाठी रोज पाच ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागत होती. त्यांची ही व्यथा जाणून ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या पुढाकाराने येथील पस्तीस गरजू विद्यार्थिनींना पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सहकार्यातून सायकलींचे वाटप करण्यात आले. नवीन सायकली मिळाल्याने या रानफुलांचे चेहरे खुलले होते.

राजूर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हा सायकल वाटप सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर होते. यावेळी ‘सकाळ’चे सहयोगी संपादक प्रकाश पाटील, उपसरव्यवस्थापक (वितरण) संजय चिकटे, व्यवस्थापक (वितरण) देविदास आंधळे,

‘सकाळ सोशल फाउंडेशन’चे व्यवस्थापक राहुल गरड, सूर्यदत्ता फाउंडेशनच्या प्रा. अश्विनी देशपांडे, प्रा. नम्रता चौधरी, आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजन पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी डॉ. सुनील बोरसे, विमा विकास अधिकारी श्रीनिवास वाणी, देविदास शेलार, उपसरपंच संतोष बनसोडे, आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष सी. बी. भांगरे आदी उपस्थित होते.

प्रा. चौधरी म्हणाल्या, की सायकली मिळाल्याने उमटलेले मुलींच्या

चेहऱ्यावरील हास्य मोलाचे आहे. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करावे. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजन पाटील म्हणाले, की मुलांपेक्षा मुली हुशार असून, मुलांप्रमाणे मुलींनाही उच्चशिक्षण पालकांनी द्यायला हवे. पालकांनी मुला-मुलींत भेदभाव न करता उच्चशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवावे. सायकली मिळाल्याने मुलींच्या शिक्षणात आता खंड पडणार नाही. या मुली शिक्षण घेऊन उद्याच्या जिजाऊ म्हणून बाहेर पडणार असल्याचे मत उपसरपंच संतोष बनसोडे यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक प्राचार्या मंजूषा काळे यांनी केले. माजी आमदार वैभव पिचड यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देत सकाळ सोशल फाउंडेशन व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे आभार मानले. संस्थेचे सचिव शांताराम काळे यांनी सायकलवाटपासाठी आपल्या शाळेची निवड केल्याबद्दल आभार मानले. सूत्रसंचालन किरण भागवत, सारिका काळे, परिचय विनायक साळवे, तर आभारप्रदर्शन विलास महाले यांनी केले.

देवाला नैवेद्य दाखवून सायकलची पूजा

सायकल आणण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते. येताना त्यांनी रानफुलांचा हार नवीन सायकलींसाठी आणला होता. धनश्री बोटे या विद्यार्थिनीने डफ वाजवून व देवाला नैवेद्य दाखवून सायकलची पूजा केली. एका आजीने आपल्या नातीला मिळालेल्या सायकलीची यथासांग पूजा केली.

मला सायकल मिळाल्यानंतर खूप आनंद झाला. मी साचवून ठेवलेल्या पैशांमधून साहित्य आणून घरी शिरा केला. सायकल मिळण्याचा आनंद आम्ही शिरा खाऊन साजरा केला. खरोखरच शाळेने मला सायकल देऊन अभ्यासात पुढे जाण्यासाठी बळ दिले.

- ओंकार विलास पथवे, विद्यार्थी,

मला रोज पायी शाळेत येण्याचा कंटाळा नव्हता, पण उन्हामुळे व पावसामुळे रोजचे अंतर पार करताना त्रास होत होता. शाळेने सायकल दिल्याने मला शाळेत येणे सोपे झाले आहे. माझा आता एकही तास बुडणार नाही.

धनश्री बोटे, विद्यार्थिनी