भविष्यातही केंद्रात भाजपाचीच सत्ता येईल- खा.सुजय विखे

अनिल चौधरी
Friday, 2 October 2020

खासदार सुजय विखे म्हणाले की, नगर जिल्ह्यात सर्वाधिक विचारवंत पारनेर तालुका आहे. यापुर्वी येथे विकासाचे राजकारण कधीही केले जात नव्हते.

निघोज (नगर) : केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी आहे, असा अपप्रचार केला जातो. मात्र रस्ता जोड, नद्याजोड प्रकल्प व पीएम किसान योजना आदी महत्वपूर्ण योजना केंद्र सरकारने सामान्य जनता व शेतकऱ्यांना न्याय दिला असून भविष्यातही केंद्रात भाजपाची सत्ता येईल आणि पंतप्रधान नरेद्र मोदीच होतील, असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला. तसेच पारनेर तालुक्यातील या रस्त्याचे श्रेय जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे व माजी खासदार दिलीप गांधी यांचेच आहे, असा उल्लेख केला. राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग 761 राळेगण थेरपाळ ते बेल्हा या रस्त्याचे भुमिपूजन खासदार सुजय विखे यांच्या हस्ते आज करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
 
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सभापती गणेश शेळके, भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, संदिप वराळ फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, सरपंच पंकज कारखिले, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्षा अश्विनीताई थोरात, आण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी खा. विखे म्हणाले की, नगर जिल्ह्यात सर्वाधिक विचारवंत पारनेर तालुका आहे. यापुर्वी येथे विकासाचे राजकारण कधीही केले जात नव्हते. विधानसभेत मी प्रामाणिकपणे प्रचार केला. ज्याच्यासाठी मी भांडलो ते आता ज्याच्याशी भांडलो ते एकत्र आले. सर्व पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की, विकासकामासाठी एकत्र या. यामध्ये राजकारण करु नका. श्रेय कोणीही घ्या पण विकासकामे करा. श्रेयवादाच्या लढाईत सामान्य जनता भरडली जाऊ नये. अशी माझी इच्छा असून सकारात्मक दृष्टीकोनातुन विकासकामे करणाऱ्यावर भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे म्हणाले की, नगर व पुणे या दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम झाले, हे तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पारनेर तालुक्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो. मात्र आज तालुक्यात विकासकामाचे श्रेय घेण्यासाठी मोठी स्पर्धा झाली. गेल्या दिड वर्षात एखाद्या गावात एक रुपयाचे काम नाही. तालुक्यात मी बोलणार मी सुजित पाटील आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी गेलो तर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो ही कोणती पद्धत आली. विमानात बसून फिरले म्हणजे विकास होत नाही. प्रत्येक गोष्टीत खालच्या पातळीवर जाऊन टिका, राजकारण, कुरघोडी व असे घाणेरडे राजकारण विरोधकांकडून सुरु आहे. याला जनताच भविष्यात जाब विचारतील, असेही झावरे म्हणाले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar district has the most thoughtful Parner taluka said MP Sujay Vikhe