अहमदनगर : शेतकऱ्यांचे आंदोलन मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar Farmers agitation back Agriculture Minister Dada Bhuse

अहमदनगर : शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

पुणतांबे : येथील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची कृषिमंत्री दादा भुसे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात बंद दरवाजाआड अडीच तास मॅरेथॉन चर्चा केली. त्यानंतर मंगळवारी मंत्रालयात बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर, चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन तूर्तास मागे घेतल्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली.

शेतकऱ्यांनी किसान क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली एकत्र येत एक जूनपासून पुणतांबे येथे आंदोलन सुरू केले होते. आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारपुढे १४ मागण्या ठेवल्या होत्या. शनिवारी आंदोलनाचा चौथा दिवस होता. कृषिमंत्री भुसे यांनी आंदोलकांची भेट घेतली, तसेच त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. चर्चेनंतर मंत्री भुसे म्हणाले, की शेतकऱ्यांचे प्रश्‍न सरकार सोडविणार आहे. कृषिमंत्री या नात्याने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या समजून घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी दूरध्वनीवरून आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा घडवून आणली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर नक्कीच मार्ग काढू. खासदार सदाशिव लोखंडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

चर्चेनंतर डॉ. धनंजय धनवटे यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. सुहास वहाडणे, धनंजय जाधव, सुभाष कुलकर्णी, सुभाष वहाडणे, चंद्रकांत वाटेकर, मुरलीधर थोरात, बाळासाहेब चव्हाण, नामदेव धनवटे यांनी आंदोलनाबाबत भूमिका मांडली. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, राजाभाऊ झावरे, शहराध्यक्ष महेश कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष अमोल सराळकर, भास्कर मोटकर, सदाशिव वहाटोळे, अनिल नळे, आबा नळे आदी उपस्थित होते. बाळासाहेब चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

चर्चेतून नक्की मार्ग निघेल

मंगळवारी मंत्रालयात कॅबिनेटची बैठक आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यात येईल. चर्चेतून नक्की मार्ग निघेल, असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

कृषिमंत्री दादा भुसे यांनी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत समाधान न झाल्यास पुन्हा ग्रामसभा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.

- धनंजय जाधव, समन्वयक, किसान क्रांती मोर्चा

Web Title: Ahmednagar Farmers Agitation Back Agriculture Minister Dada Bhuse

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top