
Ahmednagar : शेतकऱ्यांना बारा हजार कोटी
कर्जत : लबाडाचं आवतनं जेवल्याशिवाय खरं नाही, याची प्रचिती महाविकास आघाडी सरकारच्या काळात आली. त्यांनी दिलेली सर्व आश्वासने हवेत विरली. मात्र भाजप, शिवसेना, रिपाइंसह महायुतीचे सरकार आले आणि अवघ्या सात महिन्यांत बारा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे देत दिलासा दिला.
आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी खंबीर असून, संत गोदड महाराज आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या पावन भूमीत कर्जत-जामखेडला विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कर्जत-जामखेडमधील पोलिस वसाहत व ४०० केव्ही वीज उपकेंद्राचे लोकार्पण व शेतकरी मेळाव्यात ते येथे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी आमदार भीमराव धोंडे व बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,
जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, सुवेंद्र गांधी, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब नेटके, दादासाहेब सोनमाळी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, की आपण सादर केलेला अर्थसंकल्प सर्व घटकांना समाविष्ट करीत परिवर्तन करणारा असून, शेतकरी, महिला, युवकांसह सर्वांना दिलासा देण्याचे काम त्याद्वारे केले आहे. केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना विमा संरक्षण, अन्यायग्रस्त महिलांसाठी शक्ती सदन, नैसर्गिक शेतीसह देशी गोसंवर्धन, तसेच सौरऊर्जेचा वापर करीत शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने दिवसा वीजपुरवठा देणार आहोत.
आमदार शिंदे म्हणाले. की त्यांनी तुकाई चारी बंद पाडली. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार आले व काम पुन्हा जोमात सुरू झाले. पंचवीस वर्षे तहानलेल्या कर्जतच्या जनतेसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. सचिन पोटरे यांनी प्रास्ताविक केले, तर पप्पू धोदाड यांनी आभार मानले.
त्यांच्याकडून केवळ विकासाच्या गप्पा
मागच्या सरकारने विकासाच्या नावाखाली केवळ गप्पा मारल्या. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले. देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला, असे महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले.
कर्डिलेंच्या टोपीखाली दडलंय काय?
माजी आमदार शिवाजी कर्डिले हे चमत्कार करण्यात पटाईत आहेत. त्यांच्या टोपीखाली काय दडलंय, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारताच एकच हंशा पिकला.