Ahmednagar : कोपरगावातील प्रश्‍न तातडीने सोडवा माजी आमदार स्नेहलता कोल्हे मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar

Ahmednagar : कोपरगावातील प्रश्‍न तातडीने सोडवा माजी आमदार स्नेहलता कोल्हे मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

कोपरगाव : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून १०० टक्के नुकसान भरपाई देणे, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ड्रेनेजची व्यवस्था करणे, जलवाहिनी हलविणे, रस्तेदुरुस्ती आदींसह तालुक्यातील पाणी, शेतीसह इतर प्रलंबित प्रश्न मांडून ते तातडीने सोडविण्याची मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

मुख्यमंत्री शिंदे हे शिर्डी दौऱ्यावर आले असता माजी आमदार कोल्हे यांनी तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत तालुक्यातील १३ हजार शेतकऱ्यांनी विमा उतरवून हप्ते भरले. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना भरपाईपोटी ५७ कोटी रुपये मिळायला हवे होते; परंतु पीकविमा कंपन्यांकडून फक्त एक कोटी रुपये भरपाई मिळाली आहे. शासनाने हस्तक्षेप करून नुकसानग्रस्तांना विमा कंपन्यांकडून १०० टक्के नुकसान भरपाई मिळवून द्यावी. समृद्धी महामार्गाच्या प्रलंबित कामामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोकमठाण हद्दीत डक अंडरग्राऊंड केलेला असून, त्याची उंची कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण करण्यात अनेक अडचणी येत आहेत. समृद्धी महामार्गावर ड्रेनेज व्यवस्था योग्य प्रकारे केलेली नाही. जे चर तयार केलेले आहेत, ते अतिशय अरुंद असून, नळ्या टाकून पाणी जाण्याची केलेली व्यवस्था पूर्णत: कुचकामी ठरलेली आहे.

या चराचे रुंदीकरण करून नव्याने सी. डी. वर्क करण्यात यावे. महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे कोकमठाणच्या पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी या कामात दबली गेली आहे. ती अन्यत्र हलवून हे काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. ही प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशीही मागणी कोल्हे यांनी यावेळी केली.

प्रश्‍न मार्गी लावू : मुख्यमंत्री

प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू, तसेच सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांचे सर्व प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे, असे कोल्हे यांनी सांगितले.