अहमदनगर : पश्चिमेचे पाणी गोदावरीत वळवण्यासाठी प्रयत्न : विखे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Radhakrishna Vikhe Patil

अहमदनगर : पश्चिमेचे पाणी गोदावरीत वळवण्यासाठी प्रयत्न : विखे

अहमदनगर : पश्चिम वाहिन्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात आराखडा तयार केला आहे. मात्र, आघाडी सरकारने त्यावर काहीच काम केले नाही. आता आमचे सरकार आल्याने प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. या पाण्याचा नगरसह नाशिक आणि मराठवाड्यालाही फायदा होणार आहे. जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे, असा मानस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

एका कार्यक्रमासाठी ते नगरला आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. ते म्हणाले, पाण्याबाबत आम्ही नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात पाटबंधारे, कुकडीसह इतर कार्यालये लाभक्षेत्रात नाहीत. ती त्या-त्या भागात नेण्यासाठी पाटबंधारे मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे.

पश्चिमेकडे जाणाऱ्या पाण्याबाबत लवकरच प्रत्यक्ष काम सुरू केले जाईल.

वाळूतस्करांवर कारवाईसाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. येत्या आठ दिवसांत तुम्हाला त्यांच्यावर कारवाई झालेली दिसेल. त्यांच्याबाबत इतर राज्यात नेमके काय धोरण आहे, याचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. काँग्रेसच्या यात्रेवर त्यांनी टीका केली. अस्तित्वाची लढाई सुरू झाल्यानेच त्यांनी ही यात्रा काढली आहे, असे ते म्हणाले.

निविदेला नेता आडवा

नगर-मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेला पूर्वीचा राजकीय आश्रय कारणीभूत आहे. त्यांची नावे आपण नंतर जाहीर करूच, असे स्पष्ट करून महसूल मंत्री विखे म्हणाले, की या रस्त्यासाठी गेल्या दिवाळीत दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली होती. परंतु पुन्हा एकदा राजकीय नेता आडवा गेला. नंतर रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून ४९० कोटी रुपये मंजूर केले. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे ही निविदाही २७ टक्के कमी दराने गेली. त्यामुळे ही निविदाही रद्द करण्यात आली असल्याचे विखे यांनी सांगितले.

Web Title: Ahmednagar Godvari River Efforts To Divert Western Water

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..