
Ahmednagar : गुण्यागोविंदाने नांदतेय ४५ जणांचे कुटुंब
संगमनेर - भारत कृषिप्रधान देश असल्याने आजही एकत्र कुटुंबपद्धती पाहायला मिळते. मात्र गेल्या काही वर्षांत शहरीकरणामुळे ‘हम दो हमारा एक’ अशी छोट्या व विभक्त कुटुंबाची व्याख्या तयार झाली आहे.
त्यामुळे एकत्र कुटुंबपद्धती जवळपास लुप्तप्राय होत आहे. मात्र तालुक्यातील कौठे धांदरफळ येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग दामोदर घुले यांचे सात भावांचे ४५ जणांचे कुटुंब आजही एकोप्याने व गुण्यागोविंदाने राहात आहे.
शेतकरी कुटुंबातील पांडुरंग घुले ११ वर्षे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, दहा वर्षे थोरात साखर कारखान्याचे संचालक होते. घुले यांचे लहान बंधू नऊ वर्षांचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले.
मात्र आई अनसूया व चुलत्यांच्या मदतीने कुटुंबाची घडी विस्कटू न देणाऱ्या या कुटुंबातील सर्वांत ज्येष्ठ बंधू मधुकर (वय ७८), पांडुरंग, शिवराम, सुभाष, खंडेराव, लहानू, साहेबराव अशा सात भावांच्या कुटुंबातील चौथी पिढी सुखाने नांदते आहे.
यातील चार बंधू शेती, तर तिघे नोकरी करतात. वडिलोपार्जित सुमारे ७० एकर शेतीत ऊस, कांदा, टोमॅटो, गहू, घास अशी नगदी पिके व दुग्धव्यवसायाच्या उत्पन्नावर या कुटुंबाचा पिठापासून मीठापर्यंतचा सर्व खर्च चालतो. कुटुंबातील सुनांसह लहान-मोठे सर्व सदस्य विविध विद्याशाखांचे उच्चशिक्षित असून, १४ सदस्य नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतात. मात्र शनिवार, रविवार व सणासुदीला मात्र आवर्जून घरी येतात.
घरातील ज्येष्ठांच्या देखरेखीखाली वाढणाऱ्या नवीन पिढीलाही शिस्त व स्वावलंबनासह एकोप्याचे धडे मिळत असल्याने, पुरेसे स्वातंत्र्य असूनही एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सर्वांना विचारात घेऊनच निर्णय घेतले जातात. महिलांवर शेतीची कामे व अन्नपूर्णेची जबाबदारी आहे. एकीकडे विभक्त कुटुंबपद्धती वाढत असताना ४५ सदस्यांचे कुटुंब कुतूहलाचा विषय ठरतो आहे.
एकत्र कुटुंबपद्धतीचे अनेक फायदे आहेत. एखादा सदस्य आजारी असेल, तर काम अडत नाही. सांघिक शक्तीचा वापर होतो. तसेच मुलांवर चांगले संस्कार होऊन दृष्टी व्यापक होते. कुटुंबातील जिव्हाळा वाढल्याने सुख, दुःख वाटून घेता येतात. एकत्र कुटुंबपद्धतीतून आमची प्रगतीच झाली आहे.
- पांडुरंग घुले
एका वेळी स्वयंपाकघरात ९० ते १०० पोळ्या बनतात. पातेलेभर भाजी, भात, जोडीला २० लिटर दूध अशा गोष्टींचा आहारात समावेश असतो. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड मिळाल्याने, जुन्या आणि नव्या पिढीचा मेळ बसला आहे. सर्व उच्चशिक्षित स्वावलंबी असूनही कुटुंबाशी संलग्न आहेत.
- प्राजक्ता घुले, सून