नगरमध्ये कोविड लसीचा तुटवडा, दोन लाखजणांचे लसीकरण

Ahmednagar has a shortage of covid vaccine
Ahmednagar has a shortage of covid vaccine

शिर्डी ः गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक केंद्रांवर कोविड लसिचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर काही केंद्रांवरील लस संपली आहे. कोविडयोद्ध्यांसह आजवर जिल्ह्यात लस टोचून घेणा-यांची संख्या 1 लाख 90 हजारांपर्यंत गेली आहे.

कोविडची दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेबरोबरच लसीकरण मोहीमेला वेग देण्याची गरज तज्ज्ञ मंडळी व्यक्त करीत आहेत. तथापि या मोहिमेला अद्यापहि म्हणावा असा वेग आलेला नाही. त्यातच ब-याच ठिकाणी लसीअभावी मोहीम थंडावली आहे.

जिल्हा प्रशासनाने लसीची मागणी नोंदविली आहे. पुढील दोन तीन दिवसांत लसीचा पुरवठा पुर्ववत होण्याची अपेक्षा आहे. आजवर लसीकरणाच्या संख्येत मोठी संख्या कोविड योद्ध्यांचीच आहे. मागील आठवड्यात लसीकरणाला ब-यापैकी वेग येऊ लागला होता. त्यातच तुटवडा निर्माण झाल्याने ही मोहीम थंडावली. 

या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे यांच्यासोबत संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्ह्यात सुमारे 163 ठिकाणी कोविड लसीकरण सुरू आहे. त्यातील ब-याच ठिकाणची लस संपली आहे. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात शंभराहून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. जिल्हाभरातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आज लसीची मागणी नोंदविली आहे. नगर जिल्ह्यासाठीची लस पुणे येथून नाशिक येथे येते. तेथून ही लस नगर येथे आणली जाते. येथून जिल्हाभर वितरण केले जाते.

तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. प्रमोद म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार राहाता तालुक्यात लसिकरणाने चांगला वेग घेतला होता. येथील ग्रामीण रूग्णालयासह नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज प्रत्येकी दोनशेहून अधिक लोक लस टोचून घेत होते. येत्या एक एप्रिलपासून आणखी तीस आरोग्य उपकेंद्रांत लसीकरण सुरू होणार होते. काही खासगी रूग्णालयांनादेखील परवानगी दिली जाणार होती. आजवर तालुक्यात पंधरा हजार जणांना लस टोचण्यात आली. अर्थात त्यात मोठी संख्या कोविड योद्ध्यांची आहे.

उद्यापर्यंत लस येईल

लसीचा तुटवडा झाला असे म्हणता येणार नाही. उद्या (ता.1) पर्यंत जिल्ह्यासाठी लस येण्याची शक्यता आहे. लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. जेथे चांगला प्रतिसाद तेथील लस संपली तर काही केंद्रांवर लस शिल्लक आहे. 

- डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com