Ahmednagar : अतिवृष्टीतही एकरी बारा पोती सोयाबीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar

Ahmednagar : अतिवृष्टीतही एकरी बारा पोती सोयाबीन

शिर्डी : अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र रांजणगाव येथील कृषी पदवीधर शेतकरी रावसाहेब गाढवे यांनी रुंद वरंबा सरीपद्धतीने लागवड केलेले हे पीक अतिवृष्टीतही तगले. एवढेच नाही, तर त्यांना एकरी बारा पोते उच्चांकी उत्पादनही मिळाले. केंद्र सरकारच्या इक्रिसॅट या कोरडवाहू पीक संशोधन संस्थेने विकसित केलेली ही पद्धत दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या काळातही शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

याबाबत माहिती देताना गाढवे म्हणाले की, मागील पाच वर्षांपासून आपण या पद्धतीने सोयाबीनची लागवड करतो, एकरी पंधरा ते सतरा पोते उत्पादन होते. यंदा अतिवृष्टीमुळे त्यात घट झाली. तिप्पट पाऊस झाला तरीही पीक वाचले. अन्य शेतकऱ्यांचे नुकसान पाहाता हे उत्पादन उच्चांकी आहे. सात एकरांत नव्वद पोती उत्पादन मिळाले. टोकण पेरणी यंत्राच्या दोन्ही बाजूला रेझर लावून या पद्धतीने पेरणी करता येते.

सहा फुटांचा वरंबा (गादी वाफा) आणि दोन्ही बाजूला सहा इंच खोलीची सरी तयार होते. दुष्काळ पडला तर केवळ सरीत पाणी सोडून पीक वाचविता येते. अतिवृष्टीत अतिरिक्त पाणी सरीद्वारे शेताबाहेर निघून जाते. वाफसा लवकर आणि हवा खेळती राहते. तुषार सिंचन आणि औषध फवारणी सुलभ आणि खर्चातही बचत होते. दहा वर्षांपासून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी या लागवडीद्वारे अधिक उत्पादन घेण्यात तरबेज झाले आहेत. यंदा आपण या पद्धतीने वीस एकर हरभरा लागवड करणार आहोत.

कृषिशास्त्रज्ञांनी बारा वर्षांपूर्वी शोधलेली ही पद्धत देशभरातील शेतकऱ्यांना वरदान ठरली. हरभरा लागवडीसाठी देखील ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. जिल्हाभरातील कृषी अधिकाऱ्यांनी या पद्धतीने आपण लागवड केलेल्या सोयाबीन पिकाला भेट दिली.

रावसाहेब गाढवे, शेतकरी