बघा आता हे, नगरच्या कोंबड्या पिताहेत देशी दारू, गावोगाव वातावरण "टाईट"

भाऊसाहेब काळोखे
Tuesday, 12 January 2021

पाण्याच्या वाटीत टाकून कोंबड्यांना ही दारू पाजली जात आहे. कोंबडी तंगडी धरून पळायला लागल्याने सध्या गावाकडे वातावरण "टाईट" आहे.

नगर: जगात कितीही भयंकर आजार असला तरी गावाकडच्या माणसाकडे त्यावर अक्षीर इलाज असतोच असतो. कोरोनासारख्या भयंकर साथीपुढे जगाने हात टेकले होते. परंतु गावाकडच्या मंडळींनी त्यावर "देशी" इलाज काढला होता. दारू पिली की कोरोना जातो, असं या मंडळींचा जुगाड होता. त्यामुळे दारूच्या दुकानांपुढे रांगाच रांगा होत्या. 

हेही वाचा - पाथर्डीत सासूचे सुनेलाच आव्हान, आमदार राजळे जाऊबाईंच्या पाठिशी

आता बर्ड फ्लूने सर्वत्र वातावरण भीतीदायक झालंय. या बर्ड फ्लूलाही त्यांनी त्याच "देशी" औषधाची मात्रा शोधून काढलीय. आता या टॉनिकने बर्ड फ्लू किती पळून जातो, हा भाग अलाहिदा. पण गावोगावी असा देशी जुगाड सुरू आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी "बर्ड फ्लू'बाबत निश्‍चिंत आहेत. या संसर्गापासून वाचण्यासाठी काही शेतकऱ्यांनी कोंबड्यांना चक्क देशी दारूचे "टॉनिक' सुरू केलंय. सध्या गावाकडं निवडणुकीमुळे बाटल्याच बाटल्या दिसत आहेत. स्वतःसाठी एक आणि कोंबड्यांसाठी एक अशी मागणी उमेदवारांकडे होत आहे.  

एवढंच कशाला एखाद्या पिकावरील रोग पळवून लावण्यासाठी दारूची फवारणी करण्याची प्रथा काही गावांत आहे. काही शेतकरी सांगतात की खरंच दारू फवारल्याने कांद्यावरील रोग जातो. त्यांचे जाऊ द्या काही पोल्ट्रीचालक कोंबड्यांना दारूचा डोस देतात, असं सांगितलं जातं. कारण काय तर कोंबड्यांचं वजन वाढतं. बर्ड फ्लूच्या काळात कोंबड्या खरेदी करायला येणाऱ्यांनीच ही आयडिया दिल्याचे सांगितले जाते. 

पाण्यात मिसळून कोंबड्यांचे चिअर्स

पाण्याच्या वाटीत टाकून कोंबड्यांना ही दारू पाजली जात आहे. सध्या गावाकडे वातावरण टाईट आहे. काही मतदार घरात अध्यात्मिक वातावरण असूनही देशी दारूच्या बाटलीची मागणी करीत आहेत. त्यामुळे उमेदवारही संशयाने पाहत आहेत. मात्र, ही बाटली मालकासाठी नसून कोंबड्यांसाठी मागितली जाते. ग्रामपंचायत निवडणुकीत माणसांबरोबरच कोंबड्याही चांगल्याच छिंगल्याचे दिसतंय. 

 

कोंबड्यांचे "बर्ड फ्लू'पासून संरक्षण करण्यासाठी त्यांना देशी दारू देणे चुकीचे आहे. अज्ञानातून काही शेतकरी असे करीत असतील. मात्र, आपल्याकडे "बर्ड फ्लू'चा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अशा प्रकारचे उपाय करू नयेत. 
- एकनाथ मुंगसे, कुक्कुटपालन व्यावसायिक, संगमनेर. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ahmednagar, hens are drinking alcohol