रिक्षाचालकाच्या मुलीला आठ लाखांचे पॅकेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rickshaw

रिक्षाचालकाच्या मुलीला आठ लाखांचे पॅकेज

कोपरगाव : साईंच्या शिर्डीत रिक्षा चालवून माझे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कोपरगावच्या संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यावेळी फी भरण्याची पंचाईत होती. गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांना विविध संस्थांची शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी या महाविद्यालयात व्यवस्था करण्यात आली. त्याद्वारे मला कमिन्स कंपनीकडून शिष्यवृत्ती मिळाली. आज मला वार्षिक आठ लाख रुपये वेतनाची नोकरी मिळाली. आता तीनही बहिणींना माझ्यासारखेच शिकविणार आणि वडिलांची नित्याची जोखीम आणि कष्ट बंद करणार, अशा शब्दांत योगिता एकनाथ कहांडळ या विद्यार्थिनीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध शाखांत अंतिम वर्षात शिकत असलेल्या तेरा विद्यार्थ्यांना तेथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजित केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हअंतर्गत क्रिप्ट इंडिया या कंपनीने १३ नवोदित अभियंत्यांना सुरवातीस आठ लाखांचे वार्षिक पॅकेज देऊ करून नोकऱ्यांसाठी निवड केली. ही बातमी समजताच तिने वरील शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे याबाबत ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, की या तेरा विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या निकालापूर्वीच एवढ्या मोठ्या पॅकेजची नोकरी मिळाली. पर्सिस्टंट सिस्टिम्स या कंपनीने आणखी २१ अभियंत्यांना सुरवातीस चार लाख ७१ हजार रुपयांचे वार्षिक पॅकेज देऊन नोकरी दिली आहे. यातील जवळपास सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. शेतकरी, छोटे व्यापारी, खासगी व्यवसायातील नोकरदार, रिक्षाचालक, फिरते विक्रेते, अशा सामान्य आर्थिक गटातील आहेत.

उद्योगजगताला हवे असलेले शिक्षण आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्याची व्यवस्था ‘संजीवनी’ने कार्यरत केली. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च सोसणे शक्य झाले. चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याचे त्यांचे स्वप्नदेखील पूर्ण होते, याचा आनंद आणि समाधान आहे.

- अमित कोल्हे, कार्यकारी विश्वस्त, संजीवनी शैक्षणिक संकुल

Web Title: Ahmednagar Latest News Rickshaw Puller Daughter Eight Lakhs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..