
Ahmednagar : दूधभेसळीविरोधात कायदा लवकरच ; पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी : दूधभेसळीविरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेला कायदा केला जाईल. श्रीगोंद्यातील भेसळ पकडल्यावर तेथील दुधाचे उत्पादन निम्म्याने कमी झाले. एक खासगी दूध संघ हे भेसळीचे दूध विकत घेत असल्याचे निष्पन्न होत आहे.
शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रतिसादामुळे शिर्डीत भरविलेले देशातील सर्वांत मोठे महापशुधन प्रदर्शन यशस्वी झाले. शिर्डी येथे सरकारी पशू महाविद्यालय सुरू केले जाईल, पुणे येथील पशू लसनिर्मिती केंद्रात लवकरच लसनिर्मिती सुरू होईल आणि देशभर वितरित केली जाईल, अशा घोषणा राज्याचे पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या.
विखे पाटील यांच्या पुढाकारातून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने येथे भरविण्यात आलेल्या महापशुधन एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कृषिमंत्री अब्दुल सत्तार होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, मत्स्यविज्ञान विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील,
महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते आणि माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके आदी यावेळी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, की राज्यातील दीड कोटी पशुधनाला लम्पी लस देण्याचा विक्रम पशुसंवर्धन विभागाच्या लम्पी योद्ध्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलता दाखवून लम्पी प्रादुर्भाव मृत्यू पावलेल्या छत्तीस हजार जनावरांच्या मालकांना तब्बल ९४ कोटी रुपयांची भरपाई दिली. या महापशुधन एक्स्पोमुळे नवे तंत्रज्ञान पशुपालकांपर्यंत जाण्यास आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यास मोठी मदत होईल. खासदार डॉ. विखे पाटील यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यापूर्वीची पीक नुकसान भरपाई महिनाभरात दिली जाईल. पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून येथे भरविण्यात आलेले हे देशातील सर्वांत मोठे पशुधन प्रदर्शन राज्यातील पशुपालकांना आणि पशुसंवर्धन विभागाला नवी दिशा देईल.
- अब्दुल सत्तार, कृषिमंत्री
शेळी-मेंढी पालकांना बिनव्याजी पावणेदोन लाख रुपये कर्ज देण्याची योजना जाहीर करण्यात आली. पोल्ट्रीचालकांना, पिले विकणाऱ्या कंपन्यांना, फसवणूक करू नका अन्यथा कारवाईला तयार राहा, अशी तंबी दिली. शिर्डीतील पशू प्रदर्शनात नामवंत देशी वंशाचे गोधन पाहायला मिळते आहे. दूधभेसळीची खबर देण्यासाठी लवकरच टोल-फ्री क्रमांक दिला जाईल. त्याकडे अधिकाऱ्याने दुर्लक्ष केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- राधाकृष्ण विखे पाटील, पशुसंवर्धनमंत्री