अहमदनगर : महावितरणच्या दिव्याखाली वसुलीचा अंधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण

अहमदनगर : महावितरणच्या दिव्याखाली वसुलीचा अंधार

अहमदनगर : महावितरणने मागील वर्षी कृषी वीज थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे कृषी वीजबिल थकबाकी मोठ्या प्रमाणात वसूल झाली. मात्र, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडील थकबाकी महावितरण प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांची ४४२ कोटी २९ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात पथदिवे लावले जातात. या पथदिव्यांमुळे शहर व ग्रामीण भागापर्यंतचे रस्ते रात्रीच्या वेळी उजळून निघत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था ही वीज महावितरणकडून घेतात. मात्र उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने स्थानिक त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात वीजबिले थकीत आहेत. तीन हजार ६३२ ग्राहकांकडे पथदिव्यांच्या वीज बिलाचे ३७४ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकी आहे.

जिल्ह्यात सर्वांत जास्त थकबाकी पथदिव्यांची आहे. त्याखालोखाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणीपुरवठा योजनांचा क्रमांक लागतो. एक हजार ग्राहकांकडे पाणीपुरवठा योजनेचे तब्बल ६७ कोटी ८९ लाख रुपयांचे वीजबिल थकबाकी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ४४२ कोटी २९ लाख रुपयांची वीजबिले थकीत आहेत. ही थकबाकी घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांच्या थकबाकीपेक्षा खूपच जास्त आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांविरोधात कारवाई करण्यात महावितरणला काही मर्यादा येत आहेत. शिवाय कारवाई केल्यास नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांचा रोषही वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महावितरण प्रशासन कात्रीत सापडले आहे.

जिल्ह्यातील वीजबिल थकबाकी

(कंसात ग्राहक संख्या)

घरगुती - ४६ कोटी ३५ लाख रु. (ग्राहक ३ लाख ७३ हजार ९०९)

वाणिज्य - १७ कोटी ७५ लाख रु. (ग्राहक ४१ हजार ६१३)

औद्योगिक - १३ कोटी ३४ लाख रु. (ग्राहक ८ हजार ८०६)

पथदिवे - ३७४ कोटी ४० लाख रु. (ग्राहक ३ हजार ६३२)

पाणीपुरवठा - ६७ कोटी ८९ लाख रु. (ग्राहक १ हजार)

सार्वजनिक सेवा - ४ कोटी ३४ लाख रु. (ग्राहक ४ हजार ३७१)

इतर वर्गवारी - ६० लाख (ग्राहक १ हजार ५८९)