
Ahmednagar : मनपात हंड्यांचा खणखणाट; शेकडो महिलांचा मोर्चा
अहमदनगर : तपोवन रोड, सावेडी आदी भागांना दिवसाआड, सहा दिवसांनी मिळणारे पाणीही वेळेत मिळेना. अनेक ठिकाणी आठ दिवस पाण्याचा ठणठणाट होत आहे. अमृत पाणीयोजना या भागात तातडीने सुरू करावी, अशी मागणी करीत शेकडो महिलांनी आज महानगर पालिका कार्यालय दणाणून सोडले. यापूर्वी मागील आठवड्यातही पाणीप्रश्नी अधिकाऱ्यांना नागरिकांनी धारेवर धरले होते. त्यामुळे नगर शहराचा पाणीप्रश्न उन्हाळा सुरू होण्याआधीच पेटला आहे.
मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली सावेडी उपनगराच्या पाणीप्रश्नासाठी महापालिकेवर महिलांचा हंडा मोर्चा काढण्यात आला. या वेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका दीपाली बारस्कर, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे,
नगरसेविका मीना चव्हाण, निखिल वारे, बाळासाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, नितीन बारस्कर आदींसह प्रभागातील महिला उपस्थित होते. या वेळी प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, पाणीपुरवठा अधिकारी परिमल निकम, इंजिनिअर रोहिदास सातपुते आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना संपत बारस्कर म्हणाले, की सावेडी उपनगराचा पाणीपुरवठा गेल्या आठ महिन्यांपासून विस्कळित झाला आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मीटिंग घेऊन अनेक निवेदने दिली होती,
मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे व काम करण्याची इच्छा नसल्यामुळे वारंवार पाणीपुरवठा विस्कळित होऊन कमी दाबाने होतो.
नगरसेवक डॉ. सागर बोरुडे म्हणाले, की प्रभाग एकमधील विस्कळित झालेला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी मनपा प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र अद्याप प्रशासनाने यावर कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत.