आंदोलनाचा अंदाज येताच नगरसचिवांकडे अंदाजपत्रक सादर

अमित आवारी
Thursday, 8 October 2020

आता महापौर वाकळे यांच्याकडून अंदाजपत्रकी महासभा बोलावून अर्थसंकल्प मंजूर होण्याची प्रतीक्षा नगरसेवकांना आहे. अर्थसंकल्पाविना महापालिकेतील विकासकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नगरसेवकांबाबत रोष आहे. 

नगर ः महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्‍तांनी नगरसचिवांकडे सादर करावे, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांसह आयुक्‍तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. त्याची दखल घेत आयुक्‍तांनी आज दुपारी नगरसचिवांकडे अंदाजपत्रक सादर केले. त्यामुळे आता महापौरांकडून आर्थिक अंदाजपत्रकी महासभा बोलाविली जाण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेचे अंदाजपत्रक आठ महिन्यांपासून प्रलंबित होते. महापालिका आयुक्‍तांनी ते तातडीने सादर करावे, यासाठी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी काल (बुधवारी) राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस नगरसेवकांसह आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी अंदाजपत्रक नगरसचिवांकडे सादर करण्याबाबत आश्‍वासन दिले होते. त्यानुसार, आज हे अंदाजपत्रक नगरसचिवांकडे सादर करण्यात आले. 
आता महापौर वाकळे यांच्याकडून अंदाजपत्रकी महासभा बोलावून अर्थसंकल्प मंजूर होण्याची प्रतीक्षा नगरसेवकांना आहे. अर्थसंकल्पाविना महापालिकेतील विकासकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नगरसेवकांबाबत रोष आहे. 

महापालिकेचे अंदाजपत्रक नगरसचिवांकडे सादर झाले आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी तातडीने अंदाजपत्रकी महासभा बोलवावी. अर्थसंकल्पातून विकासकामांसाठी निधी मंजूर होऊन शहरात विकासकामे व्हावीत. 
- संपत बारस्कर, विरोधी पक्षनेते, महापालिका 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar Municipal Commissioner presented the budget to the Municipal Secretary