नगर महापालिकेचा शास्ती माफीचा निर्णय गुलदस्त्यात

अमित आवारी
Friday, 30 October 2020

194 कोटी रुपयांची मालमत्ताकर थकबाकी आहे. यात 102 कोटी रुपयांची शास्तीची रक्‍कम आहे. महापालिका मालमत्ता कर थकबाकीवर 24 टक्‍के शास्ती आकारते.

नगर ः महापालिकेच्या मालमत्ताकर थकबाकीवरील शास्ती माफ करावी अशी मागणी नगरसेवकांनी महापौर बाबासाहेब वाकळे व महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे केली होती. या शास्ती माफीचा निर्णय बुधवारी (ता. 28) होणे अपेक्षित होते. मात्र, हा निर्णय अजूनही तांत्रिक कारणाने गुलदस्त्यात आहे. सोमवारी (ता. 2) या बाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या अंदाजपत्रकीय सभेत सर्व नगरसेवकांनी शास्ती माफी करावी अशी मागणी केली होती. यावर महापौर व महापालिका आयुक्‍तांनी लवकरच निर्णय घेऊ असे जाहीर केले होते.

महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी याच प्रश्‍नी आयुक्‍त मायकलवार यांच्याशी चर्चा केली होती. यावर आयुक्‍त मायकलवार यांनी बुधवारी (ता. 28) सायंकाळपर्यंत निर्णय जाहीर करण्याचे आश्‍वासन दिले होते.

बुधवारी महापालिकेतील कर विभागाची बैठक झाली. या बैठकीत आयुक्‍तांनी मालमत्ताकर थकबाकीतील शास्तीची माहिती घेतली. शास्ती माफी दिल्यास किती देता येईल, किती कालावधीसाठी देता येईल, त्यातून किती वसुली होईल याबाबतचा अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार गुरुवारी (ता. 29) अहवाल कर उपायुक्‍त संतोष लांडगे यांनी आयुक्‍तांना सादर केला.

महापालिकेतील कलम 51 नुसार शास्ती माफीचा निर्णय आयुक्‍तांचा आहे. आयुक्‍तांनी याबाबत अजून काहीही निर्णय जाहीर केलेला नाही. यातच सलग तीन दिवस महापालिकेला सुटी असल्याने आयुक्‍तांना निर्णय घेण्यासाठी तीन दिवस मिळाले आहेत.
आयुक्‍तांकडे सादर केलेल्या अहवालात एक महिन्यांसाठी 75 टक्‍के शास्ती माफी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

194 कोटी रुपयांची मालमत्ताकर थकबाकी आहे. यात 102 कोटी रुपयांची शास्तीची रक्‍कम आहे. महापालिका मालमत्ता कर थकबाकीवर 24 टक्‍के शास्ती आकारते. शास्ती ही बॅंकेतील व्याजापेक्षाही अधिक आहे. महापालिकेने यापूर्वी 2018ला दोन महिन्यांसाठी 75 टक्‍के शास्ती माफी दिली होती. त्यावेळी 39 कोटी रुपये वसूल करण्यात महापालिकेच्या पथकाला यश आले होते.

शास्ती भरली त्यांचे काय?
शास्ती माफी सतत होत राहिल्यास नागरिक शास्ती माफी झाल्याशिवाय मालमत्ताकर भरणार नाहीत. त्यामुळे थकबाकी वाढण्याचाही धोका आहे. ज्यांनी यावर्षी शास्तीसह मालमत्ताकर भरला त्यांचे काय? कर थकविणाऱ्यांत नगरसेवकांचे टगेच जास्त आहेत. त्यामुळे शास्ती माफी करू नये, असे ग्राहक मंचाचे शिरिष बापट यांनी महापालिका आयुक्‍तांना निवेदनाद्वारे कळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar Municipal Corporation has not decided on amnesty