नगर महापालिकेला शास्ती माफीमुळे मिळाला ५० कोटींचा कर

अमित आवारी
Thursday, 31 December 2020

मालमत्ताकर चांगला वसूल होत असल्याचे पाहून आयुक्‍तांनी 15 डिसेंबरपर्यंत 75 टक्‍के, तर 31 डिसेंबरपर्यंत 50 टक्‍के शास्तीमाफी दिली. त्यामुळे 50 कोटींचा मालमत्ताकर वसूल झाला.

नगर ः महापालिकेने केलेली शास्तीमाफीची मुदत आज सायंकाळी संपली. शास्तीमाफीचा निर्णय महापालिकेला चांगलाच पावला. कोरोनामुळे रखडलेली मालमत्ताकराची वसुली करता आली.

वर्षभरात महापालिकेने 50 कोटींची मालमत्ताकर वसुली केली. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत काहीसा निधी जमा झाला. हा निधी महापालिका कसा खर्च करते, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा - पत्नीच्या मृत्यूनंतर लिहिलेली प्रशांत गडाखांची पोस्ट व्हायरल 

यंदाचे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शहरात कोरोनाने प्रवेश केला. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर महापालिकेची मालमत्ताकर वसुली थंडावली. चार महिने 10 ते आठ टक्‍क्‍यांपर्यंत मालमत्ताकरात सूट देऊनही ऑक्‍टोबरपर्यंत केवळ 13 कोटींचा वसूल झाला होता.

सुमारे 102 कोटींची मालमत्ताकराची वसुली थकीत होती. अशीच स्थिती राहिल्यास जास्त मालमत्ताकर वसूल होणे शक्‍य नसल्याचे पाहून महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी नोव्हेंबरमध्ये 75 टक्‍के शास्तीमाफीचा निर्णय घेतला. हा निर्णय होताच महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयांत मालमत्ताकर भरण्यासाठी रांगा लागल्या. नोव्हेंबरअखेरपर्यंत हीच स्थिती होती. 

मालमत्ताकर चांगला वसूल होत असल्याचे पाहून आयुक्‍तांनी 15 डिसेंबरपर्यंत 75 टक्‍के, तर 31 डिसेंबरपर्यंत 50 टक्‍के शास्तीमाफी दिली. त्यामुळे 50 कोटींचा मालमत्ताकर वसूल झाला. महापालिकेला 70 कोटींपर्यंत वसुलीची अपेक्षा होती. मात्र, कोरोनामुळे ठप्प झालेले नोकरी-व्यवसाय व कोरोनाच्या भितीने अनेकांनी गर्दीत जाणे टाळल्यामुळे वसुली कमी झाल्याचे बोलले जाते. शास्तीमाफीची मुदत संपली असली, तरी महापालिकेला आयुक्‍त नसल्यामुळे करवसुलीसाठी धडक मोहिमेला मुहूर्त मिळालेला नाही. 

बिले न वाटताच वसुली 
कोरोना काळातील कामांमुळे महापालिका कर्मचाऱ्यांना मालमत्ताकराची बिले वाटण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे अनेक मालमत्ताधारकांना बिलेच मिळाली नाहीत. मात्र, शास्तीमाफी जाहीर होताच, नागरिकांनी जून्या बिलांवरील मालमत्ताकर क्रमांक दाखवून कर भरला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar Municipal Corporation received a tax of 50 crores