अहमदनगर : महापालिकेच्या शाळा बनल्या हायटेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar-municipal-corporation

अहमदनगर : महापालिकेच्या शाळा बनल्या हायटेक

अहमदनगर : महापालिकेच्या १२ शाळांमध्ये ८३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शैक्षणिक वर्षात त्यांत वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी मनपा शिक्षण विभागाचे अधिकारी व शिक्षक प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांमुळेच पाच शाळांना आयएसओ मानांकन मिळून त्या हायटेक झाल्या आहेत.

महापालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाचे आपल्याच शाळांकडे दुर्लक्ष झाले होते. विद्यार्थी मिळत नसल्याने शिक्षकांनाही फारसे काम नव्हते. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये या शाळांमध्ये मोठा बदल झाला आहे. शाळांच्या इमारतींची दुरुस्ती आणि विद्यार्थ्यांच्या ई- लर्निंगसाठी महापालिकेने मोठी

आर्थिक तरतूद केली आहे. शिक्षकांनीदेखील प्रत्येक विद्यार्थी घडवण्याचे काम केले. त्यामुळेच १२ पैकी पाच शाळांची आयएसओ मानांकनासाठी निवड झाली. आणखी काही शाळांची आयएसओकडे वाटचाल सुरू आहे. ई-लर्निंगसह शाळांची रंगरंगोटी, पिण्यासाठी शुद्ध पाणी, हँडवॉश स्टँड, वृक्षलागवड, संगणक यासारख्या अनेक सुविधांकडे शिक्षकांनी लक्ष दिले. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, या शैक्षणिक वर्षात त्यात आणखी वाढ होणार आहे. काही सामाजिक संस्था देखील या शाळांना आर्थिक हातभार लावत आहेत. आणखी काही दिवसांत खासगी शाळांना आमच्याशी स्पर्धा करावी लागेल, असा विश्वास मनपा शाळांचे शिक्षक व्यक्त करत आहेत.

एकूण शाळा- १२

विद्यार्थी संख्या- ८३०

शिक्षक संख्या - ४४

वर्गखोल्या - ४४

या शाळांना आयएसओ मानांकन

ओंकारनगर शाळा, केडगाव

रिमांड होम शाळा क्रमांक दोन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, रेल्वेस्टेशन

गांधीनगर शाळा, बोल्हेगाव

महात्मा फुले प्राथमिक विद्यालय

घरी जाऊन दिले शिक्षण

मनपा शाळांच्या शिक्षकांसमोर कोरोना काळात मोठे आव्हान उभे राहिले होते. काही विद्यार्थ्यांच्या घरी मोबाईल नव्हते. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षकांनी त्यांना घरी जाऊन शिक्षण दिले. त्यांच्यासाठी स्वतंत्र छापील अभ्यासक्रम तयार केला. वेळप्रसंगी चार-चार मुलांना घेऊन झाडाखालीच शिकवणी घेतली.

सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्‍यात आले आहे. शाळांच्या दुरुस्तीसाठी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ई- लर्निंगसाठी २० लाख रुपयांची तरतूद आहे. महिला व बालकल्याण समितीकडून पाच संगणक मिळाले आहेत. शाळांना या वर्षीच्या पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे.

- एस. एस. थोरात,प्रशासन अधिकारी,शिक्षण विभाग, मनपा

विद्यार्थ्यांसाठी शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. वैज्ञानिक प्रयोग, अभ्यास सहल, वेगवेगळे खेळ यातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि शारीरीक विकास कसा होईल, याकडे लक्ष दिले जाते. ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खूप काही शिकण्यास मिळते.

- भाऊसाहेब कबाडी, मुख्याध्यापक,ओंकारनगर शाळा, केडगाव

Web Title: Ahmednagar Municipal Schools Became High Tech

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top