
नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी सुरू असलेल्या जनजागृती रथयात्रेच्या सोबत आपण असून, या विषयासाठी तुमच्यासोबत असल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
Ahmednagar News : नगरला अहिल्यादेवींचे नाव द्यावे - रोहित पवार
जामखेड - नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी सुरू असलेल्या जनजागृती रथयात्रेच्या सोबत आपण असून, या विषयासाठी तुमच्यासोबत असल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
नगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर करावे, या मागणीसाठी नामांतर कृती समितीच्या वतीने जनजागृतीसाठी सुरू केलेल्या जिल्हास्तरीय रथयात्रेचा प्रारंभ अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे झाला. त्यावेळी आमदार पवार बोलत होते.
रथयात्रेचा प्रारंभ कोल्हापूर येथील श्रीक्षेत्र गुरुदेव देवस्थान, पट्टणकोडोलीचे मुख्य मानकरी खेलोबा राजाभाऊ वाघमोडे ऊर्फ फरांदे महाराज यांच्या हस्ते व श्री विठ्ठल बिरुदेव देवस्थानचे पुजारी नारायण खानू मोटे-देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी नामांतर कृती समितीचे विजय तमनर, चौंडीचे अक्षय शिंदे, सरपंच सुनील उबाळे, अविनाश शिंदे, सचिन डफळ, निशांत दातीर, राजेंद्र तागड, अक्षय भांड, दत्तात्रय खेडेकर, अशोक होनमाने विनोद पाचरणे, संदीप भांड यावेळी उपस्थित होते.
आमदार पवार म्हणाले, की अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात आली. ही मागणी कोणा एकाची नसून, अनेक जण त्यासाठी पाठपुरावा करत होते. पुढील काळात ही मागणी विधानसभेत आली, तर नक्कीच त्यात सहभागी होणार आहे. तसेच, चौंडी येथील विकासकामांना प्राधान्य देत नऊ कोटी रुपयांची नव्याने कामे करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
तमनर म्हणाले, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३१ मे रोजी होणाऱ्या जयंती कार्यक्रमापूर्वी नामांतर झाले नाही, तर जयंती कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला. आगामी अधिवेशनादरम्यान हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नामांतराचा ‘चौंडी’चा ठराव
यावेळी अहमदनगरचे अहिल्यानगर नामकरण करावे, असा ठराव चौंडी ग्रामपंचायतीच्या सभेत सरपंच सुनील उबाळे यांनी मांडला. तो एकमताने मान्य करण्यात आला. या ठरावाची प्रत आमदार रोहित पवार यांच्या हस्ते नामांतर कृती समितीचे विजय तमनर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.