
Ahmednagar : ‘निळवंडे’च्या डाव्या कालव्याची बुधवारी चाचणी ; विखे पाटील
अकोले : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. ३१) घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पाच तालुक्यांचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
विखे पाटील यांनी आज (रविवारी) निळवंडे धरणाच्या कार्यस्थळावर ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी-अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संदर्भात आढावा घेतला. बुधवारी सकाळी १० वाजता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. येत्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही दौरा होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचेही नियोजन आतापासूनच सुरू करण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले.
याप्रसंगी माजी आमदार वैभव पिचड, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जलसंपदा विभागाचे अभियंता अरुण नाईक, पोलिस उपअधीक्षक नारायण वाकचौरे, कार्यकारी अभियंता प्रमोद माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीनिवास वर्पे, कृषी विभागाचे गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी, शिवाजीराव धुमाळ, गिरजाजी जाधव, उपसरपंच संतोष बनसोडे आदी उपस्थित होते.
विखे यांनी धरणाच्या उजव्या कालव्याच्या कामाची माहिती घेतली. तसेच दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून संबंधित विभागाने कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. कालव्यांच्या कामाचा आढावा घेऊन चाचणी झाल्यानंतर त्रुटी दूर करण्यात याव्यात, तसेच प्रलंबीत कामे मार्गी लावावेत, अशी सूचना पिचड यांनी केली. त्यावर कार्यवाही करण्याचे आदेशही मंत्री विखे यांनी दिले.
गायरान जमिनीबाबतचा प्रस्ताव तयार करा
धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना गायरान जमिनी देण्यात आल्या होत्या. या जमिनीचा प्रश्न अद्यापही शासन स्तरावर प्रलंबित आहे. याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सालीमठ यांना दिल्या. याबबात धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर घेऊन धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही मंत्री विखे यांनी दिली.