Ahmednagar : लोकहितामुळे संस्थेची भरभराट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar

Ahmednagar : लोकहितामुळे संस्थेची भरभराट

बोधेगाव : कारखाना यशस्वी करायचा असेल, तर उपपदार्थांच्या निर्मितीबरोबर ऊसउत्पादक शेतकरी, सभासद, कारखान्यातील कर्मचारी, संचालक मंडळ आणि व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. ऊस विकास केंद्रावर भर देणे आवश्यक आहे. कारखाने शेतकऱ्यांची मंदिरे आहेत. त्यात लोकहित, संस्थाहित पाहिले तर संस्थेची भरभराट आणि सभासदांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारखान्याचा सगळा खेळ रिकव्हरीवर अवलंबून असल्याने, उत्तम प्रतीचा ऊस कारखान्याला येणे आवश्यक असल्याचे मत माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे होते.

टोपे म्हणाले, की नकारात्मक भूमिका बाजूला सारून एकत्रितपणे काटेकोरपणे काम केले, तर ऊर्जितावस्था निर्माण होऊन केदारेश्वर लवकरच कर्जमुक्त होईल. केदारेश्वर कारखान्याला काही भरीव मदत लागली तर करण्यास तयार आहे. उसाला लागलेल्या डुकरांचा शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाल्याने विधानभवनात लक्षवेधी करत ''मुख्यमंत्री कुंपण योजने''ची मागणी केली आहे. सुरवातीला समर्थ कारखान्यानेही ऊस मिळवण्यासाठी संघर्ष केला, परंतु नंतर नदीवर जागोजागी बंधारे, वीज आल्याने उसाचे क्षेत्र वाढले.

गेल्या हंगामात ३० लाख टन उसाच्या क्षेत्रामधून १२ लाख टन ऊस २५ कारखान्यांना दिला. बाहेर दिलेल्या उसाला कमी भाव मिळाल्याचा फरकदेखील आम्ही भरून काढला. यावेळी सुवर्णयुग तरुण मंडळाला शासनाचे द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याबद्दल टोपेंच्या हस्ते मंडळाचा सन्मान करण्यात आला. यावेळी कृषिकेश ढाकणे, प्रताप ढाकणे यांनी कारखान्याने केलेला संघर्ष सगळ्यांसमोर मांडला.

यावेळी प्रभावती ढाकणे, तज्ज्ञ संचालक कृषिकेश ढाकणे, डॉ. प्रकाश घनवट, माजी सरपंच राम अंधारे, प्रकाश भोसले, संचालक त्रिंबक चेमटे, माधव काटे, रंगनाथ बटुळेंसह मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपट केदार, शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे, अंबादास दहिफळे, सुधाकर खोले उपस्थित होते

प्रास्ताविक अश्विनकुमार घोळवे, सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले. आभार कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट यांनी मानले.

पुरवठा निर्माण करणारे बना : टोपे

सध्या पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉलचा वापर असून, तो वीस टक्क्यांपर्यंत नेण्याचा केंद्राचा विचार आहे. हजार कोटी लिटर इथेनॉलची मागणी असताना सध्या साडेतीनशे कोटी लिटरच इथेनॉल कंपन्यांना मिळाले. बाजारपेठेची मागणी पाहता, पुरवठा निर्माण करणारे बनण्याचे आवाहन त्यांनी केले.