
अहमदनगर : जिल्हा परिषदेत टक्केवारीचे राजकारण
अहमदनगर: जिल्हा परिषदेची सत्ता यांच्या ताब्यात होती. मात्र, टक्केवारी खाण्याशिवाय यांनी काहीच केले नाही. टक्केवारी खाण्याची संस्कृती जिल्हा परिषदेत यापूर्वी नव्हती, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा नामोल्लेख टाळून केली.
विजय लॉन्समध्ये राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. बऱ्याच कालावधीनंतर एकाच व्यासपीठावर आलेल्या आमदार मोनिका राजळे व विखे यांनी या वेळी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली. या वेळी मोनिका राजळे, अरुण मुंढे, राहुल राजळे, माणिक खेडकर, गोकुळ दौंड, अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, विष्णुपंत अकोलकर, अजय रक्ताटे, बापूसाहेब भोसले, कचरू चोथे, भीमराव फुंदे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बोलताना विखे म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या शाळा झाडाखाली भरतात, मात्र खोल्या बांधण्यासाठीसुद्धा टक्केवारी घेतली जाते. जे बंधारे बांधले, ते वाहून गेले आहेत.
जिल्ह्यात नात्यागोत्याचे राजकारण सुरू झाल्याने विरोधात बोलायला कोणी नाही. मी व आमदार राजळे पडायला हवे, असे त्यांना वाटते. वयोश्री योजनेची काहींनी खिल्ली उडवली. मात्र, या योजनेचा लाभ घेणाऱ्यांनी, आपल्याला मिळालेले साहित्य गावात जाऊन जे खिल्ली उडवत होते त्यांना दाखवावे. या योजनेसाठी नरेंद्र मोदी यांनी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांची काळजी मोदी यांना असल्याने, आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर आणा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक अजय रक्ताटे यांनी केले. आभार माणिक खेडकर यांनी मानले.
Web Title: Ahmednagar Percentage Politics Zilla Parishad Mp Sujay Vikhe
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..