अहमदनगर : पोलिसांचाच लाचखोरीत नंबर वन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police

अहमदनगर : पोलिसांचाच लाचखोरीत नंबर वन

अहमदनगर : लोकसेवा करण्याच्या बदल्यात लाचेच्या रूपाने मेवा खाण्यातच काही लोकसेवक दंग आहेत, हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील आकडेवारीवरून दिसून येते. त्यांनी तब्बल ५३ लाचखोर लोकसेवकांना गजाआड केले आहे. गेल्या २० महिन्यांतील ही कारवाई आहे. विशेष म्हणजे नागरिकांचे रक्षण करणारे पोलिसदादाच या लाचखोरीत प्रथम क्रमांकावर आहेत.

लाचखोरीची हाव असलेले सरकारी कार्यालयांतील अनेक लोकसेवक आपले कर्तव्य विसरून लाचखोरीत गुंतले आहेत. नगर येथील लाचलुचपत विभागाने या लाचखोरांना तुरुंगाची हवा दाखवली आहे. त्यांत पोलिस, महसूल, महापालिका, जिल्हा परिषद, शिक्षण, महिला बालकल्याण, भूमिअभिलेख, आरोग्य यांसारख्या अनेक सरकारी कार्यालयांतील लोकसेवकांचा समावेश आहे. सात-बारा उताऱ्यावरील उताऱ्यावरील बोजा कमी करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार नुकताच शेवगाव येथे समोर आला, तर काही दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात साडेतीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वेळोवेळी कारवाई करूनही लाचखोरीचे सत्र थांबण्यास तयार नाही. या वर्षात १८ जणांना लाच घेताना रंगेहात पकडले गेले. येत्या तीन- चार महिन्यांत ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यक्त केली.

३ लाख ते ५०० रुपयांची लाच

सेवक म्हणून काम करणाऱ्या लाचखोर लोकसेवकांनी सरकारी काम करून देण्यासाठी तीन लाख ते ५०० रुपयांपर्यंतची लाच मागितली आहे. त्यात महावितरणचा वायरमन, महसूलचा तलाठी, तसेच पोलिस प्रशासनातील डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. डीडीआर कार्यालयात तर साडेतीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

शिक्षा अत्यल्प

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत लाचखोर लोकसेवकांना गजाआड केले. मात्र, अनेक जण कायद्याच्या पळवाटा शोधत राजरोसपणे पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. लाचखोरीची हाव सुटलेल्या अशा अनेक लोकसेवकांनी अपसंपदा जमवली आहे. त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन...

अर्जुनाला भगवद्‌गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण सांगतात, ‘तू कर्म करीत रहा. फळाची अपेक्षा करू नको...’ भौतिक जीवनात सरकार लोकसेवकांना केलेल्या कर्माचे फळ वेतनाच्या माध्यमातून देत असते. त्यांच्या हातून लोकांची कामे व्हावीत, ही त्यामागची भूमिका असते. मात्र, काही लोकसेवक लाचेच्या रूपाने मेवा घेण्यातच धन्यता मानतात. खरे तर हा विषय पाप-पुण्याशीही निगडित आहे. सर्वच धर्मग्रंथांत याविषयी परखड भाष्य आहे.

२० महिन्यांतील कारवाई

पोलिस १७, महसूल १२, महावितरण ५, जीएसटी १, मनपा २, भूमिअभिलेख १, सहकार २, वन २, जिल्हा परिषद ४, शिक्षण २, जातपडताळणी १, नगर परिषद १, उपनिबंधक कार्यालय १, उत्पादन शुल्क १, महिला व बालकल्याण १.

सरकारी काम करून घेण्यासाठी भ्रष्ट अधिकारी- कर्मचाऱ्यांना लाच देण्याऐवजी त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. ज्या कामासाठी लाच दिली, ते काम कायदेशीर असेल तर ते पूर्ण करून देण्याची हमी आम्ही घेतो. लाचेची रक्कमदेखील तक्रारदाराला परत केली जाते.

- हरीश खेडकर, उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नगर

ज्यावेळी कारवाई होते, तेव्हा संबंधित लोकसेवक रंगेहात पकडला जातो. यावेळी दोन पंचांच्या स्वाक्षऱ्यादेखील घेतल्या जातात. असे असतानाही गुन्ह्याचा तपास आणि दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. सरकार चार-चार वर्षे अशी परवानगी देत नाही. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचाही नाइलाज होतो.

- ॲड. श्याम असावा,सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Ahmednagar Police Number One Bribery

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..