सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला कोरोनाची ‘बाधा’ ; यंदाही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार? Ahmednagar Savitribai Phule Pune University obstructed by Corona students wasted year too | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SPPU News

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला कोरोनाची ‘बाधा’ ; यंदाही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार?

अहमदनगर : कोरोना लाटेतून जग सावरले असले, तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालय प्रशासन सावरलेले नाही. प्रवेश, अभ्यासक्रम आणि टर्म परीक्षांचा अद्यापि मेळ घालता आला नाही. परिणामी, पहिल्या सत्रातील परीक्षा मार्च महिन्यात संपल्या. दुसऱ्या टर्मसाठी आता जून-जुलै महिना उजाडेल. त्यानंतर निकालाची प्रतीक्षा, अशा दिव्यातून जावे लागणार असल्याने, विद्यार्थ्यांना पदवीसाठी एक जास्तीचे वर्ष खर्च करावे लागेल.

तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना लाटेमुळे सर्वच क्षेत्रांत वाताहत झाली. दहावी व बारावीच्या महत्त्वाच्या वर्षांच्या परीक्षांनाही ती बाधा झाली. ते त्यातून सावरले. काही विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षा घेऊन त्यावर तोडगा काढला. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नियमानुसार परीक्षा आणि प्रवेश दिले. त्यामुळे हे वेळापत्रक अद्यापि जागेवर आलेले नाही.

सर्वसाधारणपणे जून महिन्यात सर्व प्रकारचे प्रवेश सुरू होतात. दिवाळीच्या दरम्यान पहिल्या सत्रातील परीक्षा होतात. दुसऱ्या टर्मची परीक्षा मार्च-एप्रिल महिन्यात होते. कोरोनात परीक्षा आणि प्रवेश मागे-पुढे झाले. तेव्हापासून हे वेळापत्रक बिघडले आहे. या वर्षी ते पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु यंदाही तीच स्थिती आहे.

गेल्या वर्षी दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेतानाच विद्यापीठ व महाविद्यालयाच्या नाकीनऊ आले. प्रथम वर्षासह पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेताना सप्टेंबर महिना उजाडला. त्यानंतर निकालासाठी वेळ गेला. परिणामी, पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम उरकण्यास महाविद्यालयांना वेळच मिळाला नाही. अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने त्यांना आपसूकच परीक्षा उशिरा घ्यावी लागली. त्यासाठी मार्च महिना उजाडला. आता दुसऱ्या सत्रासाठी दुसरे वर्ष उजाडणार आहे.

पुढील वर्षीही तेच

ज्या विद्यार्थ्यांना पदवी किंवा पदव्युत्तर पदवीनंतर दुसरा निर्णय घ्यायचा असतो, त्यांना एक वर्ष त्याच वर्गात अडकून पडावे लागेल. परिणामी, त्यांचे एक वर्ष वाया जाणार आहे. शैक्षणिक वर्ष वाया जाणे हे सर्वार्थाने नुकसानकारक असते. केवळ या वर्षीच नव्हे, तर पुढच्या वर्षीही हीच स्थिती उद्‍भवण्याची शक्यता शैक्षणिक वर्तुळातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

संलग्न संस्था

पुणे - १५६ नगर - २३ नाशिक - ३०.

रिसर्च सेंटर - ६४ नगर ०३ नाशिक -०७.

स्वायत्त दर्जाप्राप्त महाविद्यालये - ३०

केंद्रशासित प्रदेश - ०४

दृष्टिक्षेप

  • कॉलेज - पुणे - १८३ नगर - ८३ नाशिक - ९४

  • विधी कॉलेज - १८ ०४ ०५

  • अभियांत्रिकी - ७६ १२ २०

  • वास्तुशास्त्र - २२ ०१ ०३

  • शिक्षणशास्त्र - ६३ २५ २४

  • औषधनिर्माण - ३३ ०९ १७

दुसरे टर्म लगेच

पुणे विद्यापीठाचा, ऑगस्ट महिन्यापासूनच दुसरे सत्र सुरू करण्याचा मानस आहे. त्यातच सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याच्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे. पहिले सत्र संपल्यानंतर लगेच दुसरे सत्र सुरू केले जाणार आहे. साधारणपणे ९० दिवसांच्या अध्यापनानंतर परीक्षा घेतली जाते. त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.