Ahmednagar: श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचा सवतासुभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी आमदार राहुल जगताप

श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचा सवतासुभा

श्रीगोंदे : राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेची महाविकास आघाडी आहे. येथेही आम्ही कायमच काँग्रेससोबत राहिलो, मात्र यापुढे ही सोबत राहणार नाही. आघाडी करून पाडापाडीचे राजकारण होत असल्याने आमची भूमिका यापुढे स्वतंत्र लढण्याची आहे. घनश्‍याम शेलार व बाबासाहेब भोस या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील सर्व निवडणुकांत आम्ही आमचे अस्तित्व दाखवून देणार आहोत. वरिष्ठ नेत्यांना याबाबत वास्तव पटवून देऊ, अशी रोखठोक भूमिका माजी आमदार राहुल जगताप यांनी मांडली.

‘सकाळ’शी बोलताना जगताप म्हणाले, की तालुक्यात सर्व गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. या सगळ्या गावांमध्ये आमच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे. गावातील सगळेच कार्यकर्ते एकनिष्ठ असून त्यांना आघाडी झाल्यावर न्याय देता येत नाही. त्यामुळे यापुढच्या सगळ्या निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे तालुक्यातील नेते घनश्‍याम शेलार व बाबासाहेब भोस यांचे मार्गदर्शन घेऊन या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकद लावू. आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीसह कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणूका आहेत. त्यासाठी आम्ही स्वबळावर लढणार आहोत. प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांना यातून न्याय मिळणार आहे.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

राज्यात आघाडी असताना येथे स्वतंत्र कसे लढणार असे विचारल्यावर जगताप म्हणाले, स्थानिक पातळीवर असा निर्णय घेत आहोत. आघाडी झाल्यावर पाडापाडीचे राजकारण झाल्याचा भूतकाळ आहे. त्यापेक्षा पक्षाची स्वतंत्र बांधणी करण्याची चांगली संधी आहे. आमची ताकद काय आहे, याचीही जाणीव सगळ्यांना करून द्यायची आहे. इतर पक्षातील अनेक जबाबदार कार्यकर्ते आमच्यासोबत येण्यास इच्छुक आहेत. मात्र, काँग्रेससोबत आघाडी होत आल्याने त्यांना न्याय देता येत नव्हता. यापुढे स्वतंत्र लढणार असल्याने ही संधी देता येईल. पक्षातील नेत्यांना आम्ही तिघेही एकत्र येथील परिस्थिती सांगणार आहोत. नेतेही आम्हाला मुभा देतील, असा विश्वास आहे.

राष्ट्रवादीची ताकद दाखवू

जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीच्या बारा गणांत राष्ट्रवादी आपले उमेदवार उभे करणार आहे. त्यासाठी जुळवणी सुरू केली आहे. बाजार समितीत पक्षीय राजकारण नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तेथेही आम्ही स्वतंत्र पॅनेल करणार आहोत. यापुढे ग्रामपंचायत, सेवा संस्थांमध्ये आम्ही कार्यकर्त्यांना वेगळी ताकद देणार आहोत. तालुक्यात राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष कसा आहे हे दाखवून देऊ, असा निर्धार राहुल जगताप यांनी केला आहे.

loading image
go to top