अहमदनगर : अपयश झाकण्यासाठी रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Radhakrishna Vikhe

अहमदनगर : अपयश झाकण्यासाठी रस्त्यावर

श्रीरामपूर : राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये रोज वैचारिक गोंधळ पाहायला मिळतो आहे. प्रत्येक मंत्री मुख्यमंत्री आहे. अपयश झाकण्यासाठी राज्यातील वसुली सरकारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. त्यात सामान्य माणूस भरडला जात आहे. भ्रष्टाचाराची लक्तरे रोज वेशीवर टांगली जात असल्याची टीका करीत माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या निधीतून बेलापूर येथे विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दीपक पटारे, सुनील मुथा, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, नानासाहेब शिंदे, बाळासाहेब तोरणे, संगीता गांगुर्डे आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, की राज्यातील आघाडी सरकारची पत ढासळल्यामुळे कोणी गुंतवणूकदार राज्यात यायला तयार नाही. महाविकास आघाडीचा एकेक मंत्री तुरुंगात जात आहे. दारूमुक्तीचा निर्णय घेतला. मंत्र्यांनाच पैसे पुरेनात, ते जनतेला काय देणार, असा प्रश्न उपस्थित करीत ते म्हणाले, की एसटी कर्मचाऱ्यांचा संप सत्तेचा दुरुपयोग करून मोडीत काढला. १५० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबीयांना सरकार न्याय देऊ शकले नाही. शेतकऱ्यांनाही सरकार मदत करू शकले नाही.

याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली १२० कोटी जनतेचे निःशुल्क लसीकरण करण्यात आले. कोरोना काळात एक लाख ६० हजार कोटी खर्च करून गोरगरिबांना मोफत धान्य देऊन त्यांची भूक भागविली. काश्मीरसह देशभर पंचायत राजच्या माध्यमातून गावागावांत विकासासाठी, तसेच वंचित भागांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाडसी पावले टाकली जात आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. सूत्रसंचालन देविदास देसाई यांनी केले. प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले.

महसूल खात्यात बदल्यांचे टेंडर

राज्यात वाळूमाफियांनी उच्छाद मांडला आहे. महसूल खात्यात बदल्यांचे टेंडर काढले जाते. तसे दरपत्रकच तयार केले आहे. राज्याची एवढी बिकट अवस्था कधीच झाली नव्हती. गोरगरिबांच्या जमिनी भांडवलदार, बिल्डरांना देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला.

Web Title: Ahmednagar Shrirampur Mla Radhakrishna Vikhe Criticize State Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top