अहमदनगर : शिवसेना 'संपवण्यासाठी' राष्ट्रवादीचा जन्म

खासदार डॉ. सुजय विखे, मुख्यमंत्री ठाकरेंना बाजूला होण्याचा सल्ला
MP Dr.sujay vikhe patil
MP Dr.sujay vikhe patilsakal

श्रीरामपूर : राष्ट्रवादीचा जन्म शिवसेना संपवण्यासासाठी झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नादी लागू नये. जेवढे लवकर होईल तेवढे बाजूला व्हावे, अन्यथा दोन वर्षांत शिवसेना संपल्याशिवाय राहणार नाही, असा सल्ला खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला.

श्रीरामपूरात आज एका कार्यक्रम प्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, एकीकडे सर्वसामान्य शिवसैनिक, खासदार शिवसेनेसाठी रस्त्यावर उतरले होते, तर दुसरीकडे राष्ट्रवादी कोल्हापुरात संकल्प सभा घेतली. या सभेत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचा आणि शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नाही. स्व. बाळासाहेब विखेंपासून शिवसेनेशी आमचे संबंध आहेत. शिवसेनेबद्दल विखे परिवाराला कायमच आदर राहील. राणा, संजय राऊत, किरीट सोमय्या यांच्या पलीकडे राज्य सरकारने बोलावे. दूध, कांदा, शेतकरी, वीज प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी व सरकारने भूमिका घ्यावी.

स्थानिक राजकारणावर बोलताना ते म्हणाले, राहुरी चालला नसता तर अशोकची अवस्था वाईट झाली असती. अशोकच्या कार्यक्षेत्रातील दीड लाख टन ऊस राहुरीने नेला. आम्ही मदतीसाठी येतो. श्रीरामपुरात अद्यापि तीन लाख टन ऊस शिल्लक आहे. श्रीरामपूरने विखे कुटुंबावर प्रेम केले म्हणून येथील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही श्रीरामपूरचे नेतृत्व करावे, अशी जनतेची अपेक्षा. आम्हाला आमची कामे, संस्था, प्रपंच आहेत. तुम्ही सक्षम नेतृत्व द्या, आम्ही हस्तक्षेप थांबवतो.

किसान रेल्वे सुरू करणार

नगर जिल्ह्यात एक लाख हेक्टर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. असे असताना केवळ रेल्वेने वाहतूक होत असल्याने लासलगावला चांगला भाव मिळतो. त्यामुळे श्रीरामपूरला नवीन मालधक्का व किसान रेल्वे सुरू करण्यासाठी व्यापारी व कांदा उत्पादकांची बैठक घेणार आहे. तसेच रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.

सकाळी आम्हाला, रात्री संगमनेरला भेटतात

धनश्री विखे नगराध्यक्षा होणार अशा चर्चांना पूर्णविराम देत ते म्हणाले, या पालिकेत नको रे बाबा. अशी पालिका राज्यात पाहिली नाही. श्रीरामपुरात कोण कोणत्या गाडीत कधी बसेल आणि उतरेल याचा नेम नाही. सहा महिन्यांनी येतो. त्यावेळी बऱ्याच घडामोडी घडतात. सर्व राजकीय गणिते बदलतात. आम्हाला नगराध्यक्षा किंवा आमदार व्हायचे नाही. येथील राजकीय सत्ता अस्थिर आहे. नेवासा-संगमनेरमध्ये आमचा त्रास, पक्षविरोधी काम केल्याचे आरोप होतात. मात्र, त्याला उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत. काही मंडळी सकाळी आम्हाला आणि रात्री संगमनेरला भेटतात. इकडे गोड बोलतात आणि संस्था बंद करण्यासाठी मंत्रालयात भेटी घेतात, असा टोला कोणाचे नाव न घेता लगावला.

याद राखा...

आमदार किंवा महसूलमंत्र्यांच्या सांगण्यावरून अधिकाऱ्यांनो आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय कराल तर याद राखा. मी राधाकृष्ण विखे नाही. सुजय विखे आहे. मी स्पष्ट राजकारण करतो, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com