Ahmednagar : एसटीचे भवितव्य विद्यार्थ्यांच्या पासवरच

प्रवाशांची संख्या कमी झाल्‍यामुळे तोट्यात बस सुरू करणे अशक्य
AHMEDNAGAR
AHMEDNAGARSAKAL

अहमदनगर : राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा सुरू झालेली असली, तरी प्रवाशांची संख्या कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांतील फेऱ्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यातच शाळा- महाविद्यालये बंद असल्याचाही परिणाम एसटीच्या फेऱ्यांवर झाला आहे. आता शाळा सुरू करण्याचा आदेश झालेला असला, तरी प्रत्यक्षात किती विद्यार्थी पास काढतात, यावर एसटीच्या ग्रामीण फेऱ्यांचे भवितव्य ठरणार आहे.

कोरोनामुळे शाळा या वर्षी उशिरा सुरू होत आहे. प्रत्यक्ष शाळा भरत नसल्या, तरी ऑनलाइन शिक्षण सुरू होते. मात्र, ऑनलाइन शिक्षणामुळे आर्थिक उलाढाल मंदावली आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसलाही उत्पन्न मिळते. शाळा बंद असल्याने त्याचा परिणाम ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या सुरू होण्यावर झाला आहे. प्रवासी संख्या कमी असल्यामुळे एसटीला तोट्यात बस सुरू करणे अशक्य आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी वाहनांद्वारे प्रवास करावा लागत आहे.

राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा आदेश दिल्यामुळे एसटीच्या ग्रामीण भागातील फेऱ्याही सुरू होतील, अशी आशा आहे. एसटी प्रशासनाकडून आता जिल्ह्यातील प्रत्येक गावातून किती विद्यार्थी पासची मागणी होते, याचा आढावा घेण्यास सुरवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या पासवर एसटीच्या ग्रामीण फेऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. डिसेंबर २०१९मध्ये जिल्ह्यातील सुमारे ४१ हजार ३६२ विद्यार्थी एसटीने शाळा व महाविद्यालयात शिक्षणासाठी येत होते. अहिल्याबाई होळकर पास योजनेतील विद्यार्थी २३ हजार ८०६ व मासिक पासधारक विद्यार्थी १७ हजार ५५६ योजनेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील किती विद्यार्थी शाळेत एसटीला पसंती देतात, याकडे लक्ष लागले आहे.

एसटीच्या फेऱ्या वाढवून उत्पन्नवाढीसाठी आमचे सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. शाळा सुरू होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील फेऱ्याही वाढवाव्या लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पासवर ग्रामीण भागातील फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.

- विजय गिते, विभागनियंत्रक

जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या (डिसेंबर २०१९ची आकडेवारी)

  1. अहिल्याबाई होळकर पास योजनेतील विद्यार्थी - २३,८०६

  2. मासिक पासधारक विद्यार्थी - १७,५५६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com