
Ahmednagar : केंद्रप्रमुख भरतीसाठी मिळाला हिरवा कंदील; १५ जूनपर्यंत ऑनलाइन अर्जांची मुदत
Ahmednagar - अहमदनगर केंद्रप्रमुख पदभरतीसाठी शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षकांचे डोळे या भरतीकडे लागले होते. शिक्षक संघटनांकडून या भरतीसाठी पाठपुरावा केला जात होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही केंद्रप्रमुखांची विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने याबाबत प्रसिद्धिपत्रक काढले आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांमधून स्पर्धा परीक्षेद्वारे ही केंद्रप्रमुखांची पदे भरली जाणार आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेत ही १२३ पदे आहेत. पात्र शिक्षक उमदेवारांकडून ६ ते १५ जूनच्या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
या परीक्षेबाबत माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची पद्धती, कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ या शीर्षाखाली ही भरती होणार आहे. परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्या सहीने प्रसिद्धिपत्रक देण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यात १२३ केंद्रप्रमुखांची पदे आहेत. मात्र या पदसंख्येत बदल होऊ शकतो. शासन निर्णय १ डिसेंबर २०२२नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्यांच्या जिल्ह्यातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन उर्दू माध्यमातील केंद्र प्रमुखांची पदे निश्चित करतील.
या परीक्षेमुळे बुद्धिमान शिक्षकांना केंद्रप्रमुखपदावर संधी मिळेल, ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु ज्येष्ठतेनुसार ज्या केंद्रप्रमुखांच्या जागा भरायच्या आहेत, त्या बाबतीत सरकार उदासीन आहे. यामुळे पात्र शिक्षकांवर अन्याय होत आहे. ज्येष्ठ शिक्षकांना प्रशासनाने तातडीने पदोन्नती द्यावी.
- संजय कळमकर,शिक्षक नेते.
परिषदेने भरतीसाठी कार्यवाही सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. याची यापूर्वीच कार्यवाही झाली असती, तर शेकडो शिक्षकांना याचा लाभ झाला असता.
- बापूसाहेब तांबे, जिल्हाध्यक्ष,प्राथमिक शिक्षक संघ.