esakal | पोलिस दिसताच सायरन वाजवू लागला, आत डोकावल्यावर यंत्रणाच चक्रावली

बोलून बातमी शोधा

दारूविक्रेता
पोलिस दिसताच सायरन वाजवू लागला, आत डोकावल्यावर यंत्रणा चक्रावली
sakal_logo
By
टीम ई सकाळ

संगमनेर ः कोविडच्या काळात रूग्णांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे त्या रूग्णांना कसे लुटता येईल यासाठी एक यंत्रणा राबते आहे. त्यामुळे सोशल मीडियातून काही लोकं हात धुत आहेत तर काही हात धुवून घेत आहेत, अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहे. तशाच प्रकारचा किस्सा संगमनेर तालुक्यात घडला.

पोलिस नाकाबंदी चौकीजवळ रुग्णवाहिकेने जोरात सायरन वाजवल्याने कर्तव्यावरील पोलिस निरीक्षकांची उत्सुकता वाढली. तपासणी करताना त्यात रुग्णाऐवजी थेट देशी दारुचे सात खोके आढळल्याने पोलिसही चक्रावले. त्यांनी तातडीने कारवाई करुन रुग्णवाहिकेच्या चालकासह त्याच्या साथीदारास पकडले.

विजय खंडू फड (वय 42, रा. साईदर्शन कॉलनी, मालदाड रोड) व त्याचा साथीदार कैलास छबुराव नागरे (वय 49, रा. शेडगाव, ता. संगमनेर) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास शहरातील बसस्थानक परिसरात घडली.

सध्या जिल्ह्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी जागोजागी तपासणी नाके सुरु केले आहेत. संगमनेर बसस्थानकाजवळील नाशिक, पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तपासणी नाक्‍यावर काल सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

मोठ्याने सायरन वाजविणाऱ्या रुग्णवाहिकेने (एमएच 17 सी. 8864 ) पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांचे लक्ष वेधले. रिकामी रुग्णवाहिका पाहिल्याने त्यांनी वाहन बाजूला घेण्यास सांगितले. चालकाने दूर रुग्णवाहिका थांबवली.

उत्तर देताना चालक गोंधळला. त्यामुळे पोलिसांनी रुग्णवाहिकेची तपासणी केली. त्यात रुग्णाऐवजी देशी दारुच्या 180 मीलीच्या बाटल्यांचे सात खोके आढळले. ही कारवाई पोलिस निरिक्षक मुकूंद देशमुख यांच्या पथकाने केली.

बातमीदार - आनंद गायकवाड