
पावसामुळे यंदा कपाशीचे पिक ब-याच प्रमाणात हातून गेल्याने शेतक-यांनी हंगाम पूर्ण होण्याची वाट न पाहता कपाशी उपटून रब्बीच्या गहू, हरभरा पिकांची पेरणी सुरु केली आहे.
अमरापूर (अहमदनगर) : पावसामुळे यंदा कपाशीचे पिक ब-याच प्रमाणात हातून गेल्याने शेतक-यांनी हंगाम पूर्ण होण्याची वाट न पाहता कपाशी उपटून रब्बीच्या गहू, हरभरा पिकांची पेरणी सुरु केली आहे.
मुबलक पावासामुळे पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने कपाशी ऐवजी बागायती पिकांकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा कापसाचे उत्पादन ब-याच अंशी घटणार आहे.
तालुक्यात जुन पासून मोठया प्रमाणावर अतीवृष्टी झाल्याने खरीपाच्या पिकांमध्ये पाणी साचले. त्यामुळे कपाशीसह अनेक पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. कपाशीची खालच्या बाजूची बोंडे काळी पडून सडुन गेली. तर अतिरीक्त पाण्यामुळे कपाशी पिवली पडून त्याची वाढ खुंटली. त्यामुळे कापसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. कोरडवाहू क्षेत्रात अवघा एक ते तीन क्विंटल कापूस प्रति एकरी हाती आला आहे. त्यातून झालेला खर्चही निघत नाही. तर झाडावर आणखी कै-या नसल्याने यापुढेही कापूस निघण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतक-यांनी कपाशी उपटून त्याजागी गहू, हरभरा, ज्वारी, ऊस या पिकांची लागवड सुरु केली आहे.
यंदा बंधारे, नदया, ओढे, तलाव, भरलेले असल्याने भुजल पातळी मोठया प्रमाणात वर आली आहे. त्यामुळे विहीरी कुपनलिका यांना मुबलक पाणी आहे. अशा परिस्थितीत कपाशीच्या उत्पनाची फारशी वाट न पाहता ती काढून टाकण्यावर शेतक-यांचा भर आहे. त्यातच हाती आलेला कापूस विकून रब्बीच्या पिकासाठी तयारी सुरु आहे. त्यामुळे यंदा कापसाचे उत्पादन ब-याच अंशी घटणार आहे. 43 हजार हेक्टरपैकी जवळपास 50 टक्याहून अधिक कपाशी शेतक-यांनी काढून टाकली आहे.
संपादन : अशोक मुरुमकर