धांदरफळ खुर्दचा अमोल खताळ भारतीय लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रातून बेपत्ता

आनंद गायकवाड
Thursday, 22 October 2020

जबलपूर (मध्यप्रदेश) मधील भारतीय लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रातून 31 मे 2005 पासून बेपत्ता झालेला, संगमनेर तालुक्याच्या धांदरफळ खुर्द येथील अमोल संपत खताळ याची त्याचे कुटूंबिय चातकासारखी प्रतिक्षा करीत आहेत.

संगमनेर (अहमदनगर) : जबलपूर (मध्यप्रदेश) मधील भारतीय लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रातून 31 मे 2005 पासून बेपत्ता झालेला, संगमनेर तालुक्याच्या धांदरफळ खुर्द येथील अमोल संपत खताळ याची त्याचे कुटूंबिय चातकासारखी प्रतिक्षा करीत आहेत. लष्कराकडेही तो जीवंत असल्याबाबत कोणताही पुरावा नाही. मात्र सुमारे 15 वर्षांपासून अमोल खताळचे बेपत्ता असणे संशयास्पद असून, त्याचा शोध अद्यापही कुटूंबिय घेत आहेत. 

घरची आर्थिक परिस्थीती बेताची असल्याने, बारावी नंतर अमोल 3 सप्टेंबर 2004 रोजी सैन्यदलातील सिग्नल रेजिमेंटमध्ये भरती झाला. मध्यप्रदेशातील जबलपूर येथे त्याचे लष्करी शिक्षण सुरू झाले. त्याने 19 मे 2005 रोजी दूरध्वनीवरून 11 ते 27 जून या कालावधीत तो सुट्टी घेवून घरी येणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कामावर हजर होणार असल्याचे घरच्यांना सांगितले.

हा त्याच्याशी कुटूंबियांचा झालेला शेवटचा संपर्क. 31 मे 2005 पासून अमोल जबलपूर येथील प्रशिक्षण केंद्रातून निघून गेल्याची तार 8 जून 2005 रोजी त्याच्या घरी आल्यानंतर कुटूंबीय चक्रावले. त्याचा मोठा भाऊ निलेश याने तातडीने जबलपूर गाठले. तेथे चौकशी करता, अमोल अंगावरच्या कपड्यानिशी प्रशिक्षण केंद्रातून निघून गेल्याचे सांगण्यात आले. तेथे त्याचे दररोजच्या वापरातील सामान व बॅंकेत पैसेही तसेच होते. या नंतर निलशने 14 नोव्हेंबर 2005 रोजी गोराबाजार (जबलपूर) येथील पोलिस ठाण्यात अमोल हरविल्याची तक्रार दाखल केली. 

अमोलच्या घरी तो प्रशिक्षण केंद्रातून पळून गेल्याचे पत्र आल्याने त्याचे आई, वडील, भाऊ, बहीण अशा सर्वांनाच धक्का बसला. स्वखुषीने सैन्य दलात नोकरीसाठी गेलेला अमोल कधीही पळून जावूच शकत नाही यावर ते आजही ठाम आहेत. या बाबत दिवगंत राष्ट्रपती डॉ. ए .पी. जे. अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहखाते व सैन्य दलाकडे अमोलच्या बेपत्ता होण्याविषयी त्याच्या कुटूंबीयांनी पत्रव्यवहार केला आहे. परंतु 15 वर्षांनंतरही त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. 

अमोलचा शोध घेण्यासाठी दोनदा जबलपूरच्या प्रशिक्षण केंद्रात दाद मागितली. राष्ट्रपतींपासून सर्वत्र पत्रव्यवहार केला, मात्र पदरी निराशा पडली आहे. 31 मे 2005 पासून अमोल धांदरफळ खुर्द येथे आला नसल्याचे ग्रामपंचायतीचे पत्र जबलपूर प्रशिक्षण केंद्राकडे पाठविले आहे. त्याचा 15 वर्ष शोध घेवूनही तो सापडला नाही अथवा त्याची कुठलीही माहिती मिळाली नाही. प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. अमोलला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे.
- निलेश खताळ, अमोलचा मोठा भाऊ 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amol Khatal of Dhandarphal Khurd disappears from Indian Army training center